मी मुळचा खेडूत, बालपण शेती, चिमणी, कावळा, तितर, बटेर, फुलपाखर, सोनपाखर, प्राणी अन जंगलात गेलं. घरात धान्य वाळायला टाकल की चिमण्या ताव मारायला हमखास यायच्या. बिब्याची फुलं, टेंभूर्ण, बोर खायला गेलं की असंख्य पक्षी दिसायचे. गावातही चिमण्या कावळे भरपूर होते. बिबळ्या, कोल्हा, लांडगे तर चक्क गावाजवळच्या नाल्यात पाणी प्यायला यायचे. मात्र काळ बदलला, जंगलं आम्ही तोडून खाल्लीत, मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. शहरातील ‘घर संस्कृती’ ही ‘बँगलो कल्चर’ मध्ये बदलली. शहरात ‘पी.ओ.पी’ आणि ‘शो रूम संस्कृती’ आली अन पक्ष्यांच्या जीवनशैलीला अवकळा आली. आपल्या घरात व मनुष्यवस्तीजवळ सहज आढळणारी चिऊताई सुद्धा या संकटात सापडली. आपल्या आधुनिक जीवनशैलीच्या विळख्यात या सिमेंटच्या जंगलात चिमण्या कधी हरवल्या हे कळलं सुद्धा नाही. बर चिमण्यांचा संवर्धन होत नाही, असही नाही, चिमणी सामान्य जनतेचा आवडीचा पक्षी आहेच, चिमण्यांना जीवदानही दिल्या जात. मात्र असा वर्ग तुलनेने फारच कमी आहे. म्हणून चिमण्यांसकट सगळ्याच पक्ष्यांचा चिवचिवाट अलीकडे कमी झाला होता. संख्येनेही पक्षी कमी झाले आणि वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे त्यांचे आवाजही आपल्याला काणी गुंजत नव्हते. पण गेल्या काही दिवसात आपल्याला पक्ष्यांचे आवाज ऐकू यायला लागले. फेसबुक व इतर समाज माध्यमांवर तशी छायाचित्र सुद्धा पसरायला लागली. एकीकडे ‘कोरोना’च्या कोपामुळे माणसचं माणसांना नकोशी झाली असतांना काही काळ का होईना पक्ष्यांच्या या चिवचिवाटामुळे आपल्याला हायस वाटू लागल. कोरोनाच्या थैमानामुळे आपलं जगणं दुरापास्त झालं पण पक्ष्यांना मात्र काही काळ का होईना त्यांच नैसर्गिक जीवन परत मिळालं असही लोकं बोलू लागलेत. खर तर पक्ष्यांचा व दिनचर्या पाहून अख्ख पक्षीजीवन आनंदोत्सव साजरा करीत असल्यासारख वाटत आहे.

रस्ते, वाहतूक, दळवळण, बाजार, मॉल, करमणूक करणारी चित्रपट गृहे, पब, बार, कार्यालय आणि कामाची गडबड सगळं काही एका क्षणात थांबल. आजवर पोपट व इतर पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणाऱ्या नागरिकांनाच आता पिंजऱ्यात रहायची वेळ आली. निसर्गाच चक्र बघा कस आहे. निसर्ग स्वतच नियमन करतो याच हेही एक उदाहरण म्हणता येईल. माणसाला घरातून बाहेर निघण जीवघेण झालं असतांना पक्ष्यांचा मुक्त संचार पाहून माणूस किती उपरा याचीही प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. जणु पृथ्वी हाकायचा ठेका आपणच घेतला होता की काय, याच अविर्भावात आपण जगत होतो. हा जगावर झालेला चीनचा प्रकोप असो की निसर्गाचा प्रकोप तो येणारा काळ नक्की सांगेल. हा ‘कोविड-१९’ अजूनही थैमान घालतोच आहे. या दुखाच्या सावटात आपलं जगणं हिरमुसलं झालं असतांना काही काळ का होईना या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने अनेकांना नैसर्गिक जीवन परत मिळाल्याच्या भावना मनात येत आहे. समाजमाध्यमातून त्या भरभरून व्यक्तही होत आहे. यामध्ये तांबट, शिंजीर, सातभाई, बुलबुल, सुभग, वटवट्या, दयाळ, चिरक, कोतवाल, होला, पारवासह अनेक पक्षी आहेत. मात्र जनमानसांना सर्वाधिक आनंद चिऊताई च्या चिवचिवाटाने झाल्याच चित्र दिसत आहे. कारण पक्ष्यांच्या प्रकारातला आपल्या सर्वाधिक आवडीचा पक्षी म्हणजे चिमणीचं होय. शहरात आता चिमण्या दिसेनाश्या होत चाललेल्या असतानाचा अचानक जग थांबलं, वाहतूक थांबली, जणु मानवाच जीवनच थांबल आणि चिमण्यासकट पक्षीजीवन शहरात फिरकायला लागलं. काही शहरातील रस्त्यावर तर चक्क हरीण आणि मोर देखील फिरकायला लागल्याची छायाचित्रे व्हायरल झाली होती. अनादिकाळापासून हे चित्र विकासाच्या घोळक्यात हरवलेल होत.

आपण चिमण्यांच्याच बाबतीतलं उदाहरण घेऊया ना….! अलीकडच्या काळात चिमण्या कमी झाल्या होत्याच. चिमण्यांचा अधिवास नष्ट होणे हे चिमण्या कमी होण्याच मुख्य कारण आहे. शहरी आणि आता खेड्यातही सिमेंटच्या घरामुळे चिमण्यांना घरटी करायला जागा नाही. हे चिमण्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ही बाब अतिशय घातक आहे. चिमण्यांचा विणीचा काळ हा जवळजवळ वर्षभर असतो. चिमण्या एका वर्षात अंदाजे तीन ते चार वेळा अंडी देतात. विशेष म्हणजे चिमण्या आपल्या मिलन काळात मातीत आंघोळ करतात. त्यांच्या विणीसाठी हे खूप महत्वाच आहे. मात्र आता शहरात मातींच दिसेनाशी झाली आहे. घर, अंगण सगळीकडे सिमेंटचे बांधकाम असतांना त्यांचा इथे टिकाव लागलं मुश्कीलच, त्यातल्या त्यात चिमण्यांना घरटी करण्यासाठी गवत व इतर नैसर्गिक काडीकचरा लागतो. शहरात गवत अतिशय कमी प्रमाणात आहे. घरटी करण्यासाठी गवत व नैसर्गिक साहित्य जर असेल तर ‘अंडी’च्या तापमानात नैसर्गिकरित्या नियमन होते. त्यामुळे त्यांचा प्रजनन दर वाढतो. मात्र गवत नसल्यामुळे त्यांना इतर वस्तूपासून घरटे करावे लागत आहे. नैसर्गिक वस्तू जसे गवत उलपब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या भावी पिढीवरही याचा वाईट परिणाम होतो आहे. प्रसंगी नैसर्गिक विणीवर कृत्रिम वस्तूंचा भस्मासूर आघात करतो आहे. बरेचदा चिमण्या आता आपल्या घरातील पंख्यावर, विजेच्या मीटरवर असे अधांतरी घरटे करतात असे होत असल्याने अनेकवेळा घरट्यातून पिल्ले खाली पडून त्यांचा मृत्यू होतो.

आपला देश कृषीप्रधान आहे. पूर्वापारपासून आपल्या देशात मोठ्या प्रमाणात ज्वारी, गहू व इतर अन्नधान्य पिकत होते. हरितक्रांती होण्यापूर्वी त्यांना रासायनिक खते व औषधे याचा वापर नसलेले शुद्ध अन्न व त्यातील अळ्या भरपूर खायला मिळत होत्या. आता सगळीकडे रसायने व औषधांचा  वापर होत आहे. अन्न खराब होऊ नये, कीड लागू नये म्हणून औषधी लावली जाते. यामुळे विषारी रासायनिक घटक चिमण्यांच्या शरीरात जातात. शहरात झुडपे व झाडांची संख्या कमी झाल्यामुळे देखील चिमण्यांचा संख्येवर तसेच अधिवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तर शहरातील केबल वायर व मोबाईल मुळे त्यांचा प्रजनन क्षमतेवर त्यांच्या मानसिकतेवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. एके काळी हीच चिमणी भारतातील सर्वाधिक संख्येने व सगळीकडे आढळणारा पक्षी होता. मात्र अलीकडच्या काळात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. कोणे एके काळी हा देश चिमनींचा देश म्हणून सर्वपरिचित होता. अलीकडे चिमण्या दिसेनाश्या होत चालल्या असतांनाच अचानक ‘कोरोना’ या महाभयंकर आजाराची सुरवात झाली आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट आपल्या कानावर येऊ लागला आहे. या बाबतीत काही पक्षीप्रेमींकडून माहिती घेतली. गेल्या दहा दिवसात  पक्षी मोठ्या प्रमाणात दिसु लागले आहेत, त्रास नसल्यामुळे पक्ष्यांची हिम्मत वाढली असल्याच पक्षीप्रेमी तथा वरिष्ठ भूवैज्ञानिक सुनील कडू यांनी सांगितले. वन्यजीवप्रेमी मुकेश चौधरी म्हणाले की, मुंबईत आता पक्ष्यांचा मंजुळ आवाज काणी पडतोय. मोटारींच्या आवाजा ऐवजी  दिवसभर येणारा पक्ष्यांचा आवाज आनंददायी वाटतो आहे. म्हणजेच सगळीकडे हाहाकार माजला असतांना आणि भीतीदायक चित्र असतांनाही कानावर पडणारी किलबिल सगळ्यांना सुखावणारी आहे. आणखी किती काळ हा ‘लॉकडाऊन’ चालेल याचा अंदाज बांधण सध्या तरी शक्य नाही. एकदा का हा ‘लॉकडाऊन’ पूर्णपणे संपला की परत आपलं तेच जिवनाच रडगाण घेऊन आपल्यालाही या विकासाच्या मैफिलीत शामिल होण भाग आहे. आपल्या अस्तित्वाची ही अपरिहार्यता असली तरीही या गेल्या वर्षभरात अनेक नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाता आलं, त्याची किमया समजून घेता आली. जीवन नाशिवंत असून आपण आपल्या माग लावेलेली घोडदौड किती तकलादू आहे याचही ज्ञान झालं. म्हणूनच वर्षभर पक्ष्यांनी आपल्या अंगणात येऊन किलबिल करावी असे वाटत असेल तर यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करुया. त्यांच्यासाठी मातीची, लाकडाची घरटी व उन्हाळ्यात पाणी ठेऊया. आपल्या घरातील परसबागेत, विजेच्या मीटरवर, खिडकीत घरटे केल्यास ते न काढता त्यांना आश्रय देऊया. सांस्कृतिक वारसा, जैवविविधतेत महत्वाचे स्थान आणि पर्यावरण संतुलनात आणि आपल्या अस्तित्वासाठी पक्षी व इतर जीवन महत्वाचे आहेत. निसर्ग आणि निसर्गातले हे जीवन टिकले तरच आपल् अस्तित्व कायम असणार आहे. म्हणून त्यांना अभय देऊन आपण आपलंच संवर्धन करुया. पुढील सूचना येईस्तोवर घरातच बसा, दुसरा पर्याय आहे तरी कुठे..? म्हणून तूर्तास आनंद घ्या निसर्गाचा, पक्षांच्या किलबिलाटाचा…! आज २० मार्च जागतिक चिमणी दिवस आहे. चला तर मग चिऊताईचा वाढदिवस साजरा करुया.

@ यादव तरटे पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
संपर्क- ९७३०९००५००
http://www.yadavtartepatil.com

21 thoughts on “चिऊताईचा वाढदिवस….!”

  1. Excellent, really ata parat chimnaya disatvahet pani pyla kiva gharasathi jaga shodaila yet ahet, I feel it’s good sign and hope as well as try my best for better

    1. Thank you very much Pratima Didi, आपल्या सारख्या संवेदनशील मनाच्या व्यक्ती आहेत. याचा अभिमान वाटतो. धन्यवाद

  2. यादव सर,
    आज तुम्ही सर्वांच्या आवडीच्या विषयाला हात घातला बद्दल तुमचे अभिनंदन?
    ..लहानपणी जेवढ्या चिमण्या दिसायच्या त्याच्या कितीतरी कमी संख्येने आजकाल आढळून येतात.शहरात तर परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे.एकाच गावातील गजबजलेल्या भागात चिमणी दृष्टीस पडणे दुर्मिळ झाले असतांनाच बाहेरील कॉलनी भागात थोड्या मोकळ्या वस्तीत चिमण्या दृष्टीस तरी पडतात..मी स्वतः चिमण्यासाठी 4 कायमची घरटी करून उंचावर टांगलेली आहे..आता चिमण्यांची चौथी पिढी त्या घरट्यात अंडी घालण्याच्या लगबघीत आहे…माझ्या गच्चीवर छोटेसे गार्डन केले असून तिथे चिण्यासाठी मातीच्या भांड्यात पिण्याचे पाणी व काही धान्य टाकल्यामुळे सकाळी सकाळी मस्त चीवचिवाट ऐकून मन तृप्त होत…
    जास्तीत जास्त लोकांनी जर या पुण्यकर्मा साठी हातभार लावला तर निसर्गसवर्धनाच्या कामासाठी ते एक विश्वासक पाऊल ठरेल.

    1. वाह सर
      आपण करीत असलेलं कार्य उत्तम आहे. कृपया मला सर म्हणून नका, आपण मला यादव म्हणा, आपल्यासारख्या निसर्गप्रेमीमुळेच आज पक्ष्यांना अभय मिळतो आहे. प्रतिक्रिया दिली त्यासाठी अनंत आभार…!

  3. वा खुप छान

    आज खुप दिवसानी चिंमण्याना पहीले खिडकीबाहेर

    1. हो ना
      त्यात एक वेगळीच जादू आहे आणि अनुभव मी समजू शकतो. धन्यवाद

  4. Sir firstly I want to Congratulate u that God fulfills u with the Golden Happiness which is not even imagine by powerful Person of of this World…….that is ……”Nature and it’s Purity.”……… u r really The King of ur own Kingdom ….U think y I am saying this……Because ur each and every post are reveal it….About this Article……….I am really Speechless U r revealing another Aspect of such Worse Days…..Even I changed my attitude for Covid-19…….
    Nature is able to look after it’s own importance.. ..it’s Again Prove…… Present Ozon layer…..is the Best Example….. .I pray to Nature that he blessed U with more and more treasure of Knowledge and freedom of Thoughts……..and thanks To connect and involving us to ur KINGDOM…..KEEP IT UP

    1. WoW
      what a compliments. I am feeling your words in my hearts. I can here you. Great appreciation by you. thank you thank you very much. keep in touch with my green world.

  5. Very good Yadav…
    It’s amazing because your heart touching experience writing touching others heart and gives live experience of Jungle….
    Nature blessed you..

    1. Thank you very much Dear Shrikant. Friends like you always boost me to do this. Although nature is our guru a supreme power. Thank you very much once again.

  6. आज सकाळी उठल्यावर चिऊताई चे दर्शन झाले व आता आपला लेख दिसला व एक दमात वाचून काढला।लेखाबद्दल सांगायचे तर टिपिकल यादव style लेख लिहला। अत्यंत अभ्यासपूर्वक लिहिलेले उत्तम निरीक्षण व लिखाण आहे। लेखात बारकावे व निरिक्षण यांचे उत्तम भान साधले आहे।
    लहानात लहान नोंदी लिहलेल्या आहेत। वन,वन्यजीव व पक्षी याबद्दलची कळकळ व त्यांचे संवर्धन कसे करता येईल या बद्दलची आपली भावना दर्शवणारा एक अतिउत्तम लेख असेच म्हणावे लागेल।
    आपण असेच जनजागृती चे काम करत रहा आम्ही आपल्या सोबत आहे।

    एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चिमण्यांची कमी झालेली संख्या। याला बरीच कारणे आहेत व आपण याचा उल्लेख केला आहेच। पण माझ्या मते अजून एक कारण म्हणजे फ्लॅट स्कीम व शहरातील वाढलेली कबुतर व पोपटांची संख्या।कबुतरे खूपच खादाड असतात व ते चिमण्यांना खाऊ देत नाही व त्यांच्यावर आक्रमण करतात।याचा अनुभव मला आला।जेंव्हा कबुतरे फ्लॅट स्कीम मध्ये न्हवती तेंव्हा भरपूर चिमण्या होत्या पण कालांतराने जेंव्हा कबुतरांनी फ्लॅट स्कीम मध्ये आसरा घेतला त्यानंतर मात्र चिमण्यांची संख्या कमी झाली।

    अप्रतिम व उत्तम अर्थपूर्ण लेख वाचल्याचे समाधान झाले।
    हो भूगोल जर नष्ट झाला

    तर
    आपणसुद्धा इतिहासात जमा होऊ ही धोक्याची सूचना व नांदी आहे।
    डॉ अ द खोलकुटे
    9822718291

    1. आदरणीय गुरुजी खूप खूप धन्यवाद, आपली सूचना योग्य आहे. आशीर्वादबद्दल धन्यवाद

  7. निसर्ग दुत श्री तरटे सर यांना खुप खुप धन्यवाद…..आपल्या लेखन शैलीतुन नेहमीच समाधान व निसर्गाशी समरस होण्याची जणु संधीच मिळते. बाकी चिऊताईच्या वाढदिवसाला आम्हाला बोलवल्याबद्दल आपले मनस्वी आभार. निसर्ग तुम्हाला यश, सुख, सम्रूद्धी देओ हिच प्रार्थना.
    महत्वाचे राहुनच गेले…..
    WISH YOU A VERY HAPPY BIRTHDAY CHIUTAI
    STAY BLESSED TO GIVE THE IMMORTAL MUSIC

    1. आपले अनंत आभार आहे. खूप खूप धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *