वसंत आपल्या येण्याची वर्दी माघातल्या वसंत पंचमीला देतो. हा वसंतोत्सव जवळजवळ वैशाखापर्यंत चालतो. आम्रवृक्ष, पळस, पांगारा, काटेसावरासह आदींना वसंताची चाहूल लागते. म्हणूनच नक्षत्रांची ही रांगोळी व त्याच्या पावलांचे ठसे जंगलावर रेखाटले जातात. इतकंच काय हा वसंत मानवाच्या उत्सवप्रियतेलाही प्रोत्साहन देतो. बांबूच्या बनात, चंदनाच्या वनात, आंब्याच्या आमराईत, पळसाच्या फुलात, काटेसावरीच्या मधूरसात पावलोपावली आपल्याला वसंत भेटतो. पाणगळ झाल्यावर झाडांना नवी कोरी व करकरीत पालवी फुटते. सुकलेल्या फांद्यांना नवसंजीवनी येते. जणु भरात आलेलं नवतारुण्य आसुसलेल्या प्रेमभावनेला साद घालतेय, ते तारुण्य फाल्गुनातल्या रंगपंचमीला रंग खेळायला बोलावतेय असच वाटते. हा निसर्गाचा रंगोस्तव एक वेगळ्या रुपाने फुलपाखरे, पक्षी, कोळी व मानवाच्या जीवनातही नवचैतन्य आणतो.

वसंतात फुलणाऱ्या वृक्षांच्या फुलात मधुरस असतो. आपल्या लवचिक पाकळ्या हवेत हेलकावतांना फुल नकळत सुगंधही पसरवितात. आपलं फुलण्याचं दिव्य दाखवण्यासाठी जणु तांच्यात अलिखित स्पर्धा चालली आहे असही वाटतं. ही केवळ इतकीच मर्यादित स्पर्धा वाटत नाही तर अनेक जीवांना जीवन देणारी स्पर्धा ठरते. फुलपाखरे, कीटक, पक्षी व प्राण्यांना तर हा वसंत जीवन देणारा ठरतो. निसर्गाचे ऋतुचक्रात बघा ना काय जादुगीरी आहे. ऋतूनिहाय जीवनशैली आणि जैवविविधतेच नात आपल्याला वेगवेगळ्या रुपाने इथे अनुभवायला मिळते. वर्षभरातला आळस झटकून नवी उर्जा देणारा हा सोहळा जंगलात अनुभवतांना आपल्या मनाला उभारी येते. वसंताचा बदल आणि तो वसंत सूर्योदयाच्या साक्षीने सजीवसृष्टीला आपलं अणुभव वाटतानाच आनंद सोहळा प्रचंड मनमोहक असतो. आपला मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्यांच्या संसाराचा गाडा पूर्णत्वाकडे जावा म्हणून काहींनी याच वसंतात आपल्या प्रनयजीवनाची सुरुवात केलेली असते. कावळयाची कावकाव, कोकीळेची कुहुकुहु, बुलबुलांची पिकपिक, मैनेच गीत हे सगळं ऐकण्यासाठी माझ्यासकट चराचरातील प्रत्येक अणुरेणू ऐकायला आसुसलेलं असतं. फुलपाखरू अन भुंगा देखील वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच फुलाभोवती रुंजी घालायला लागतो. वसंताच्या आगमनाची वार्ता त्याला सांगावी लागत नाही…! फुलपाखरे आणि पक्षी हा रंगोस्तव खेळण्यासाठी सज्ज होतात. इतकच काय तर ते नकळतपणे इतरांनाही खेळायला सांगतात. या ऋतुराज वसंताच जादूई साम्राज्य इतकं विस्तारेल असतं की, आंब्याच्या मोहोरावर मधमाश्यांची गिरकी, पाखरांच्या मधधुंद गळयाच्या चिवचिवाट मनाला सुखावणारा ठरतो. हा वसंत किती किमयागार आहे ना..! फेब्रुवारी महिना मध्यावर येताच पळसाची पानं गळतात. पान गाळताचं लालशकेसरी फुले येतात. अख्ख झाड नखशिखांत फुलतं. म्हणूनच पळसाला ‘वनाग्नी’ किंवा ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. जंगलात दुरुनच लाल पळस एखाद्या ज्वालेप्रमाणे चमकतो. शेवरचे झाड देखील या स्पर्धेत मागे नाही. भेंडीप्रमाणं दिसणारी कर्णाकृती गोल फुलं येताच ती फुल सर्वांना हवीहवीशी वाटतात. निष्पर्ण झाडावर फुलांचे लटकलेले घोस अन त्यातल्या मधावर कीटक आणि पक्षी मनसोक्त ताव मारतात. कधीकधी तर जमिनीवर पडलेली फुले खायला भेकर, ससे व अस्वलही येतात.

शिशिर ऋतूत पानगळीनंतर वसंत सर्वांगाने फुलून येताच एक एक झाड आपलं सौंदर्य किती उठून दिसेल याच तयारीत आहे की काय अस वाटायला लागते. कडाक्याचे उन वाढताना हे पुष्पवृक्षंही वातावरणात रंगाची उधळण करत असतात. पळसाच झाड लाल रंगात न्हाऊन निघालेलं असतं. काटेसावरावर तर फुलंच फुलं आणि केवळ काटेचं दिसतात. पानाचा तर पत्ताच नसतो. सृष्टीचं हे रंगभरलं रूप जसं माणसांना भावतं तसं ते कीटक आणि पक्षांनाही भावतं. एरवी या काटेरी झाडांकडे ढुंकूनही न पाहणारे पक्षी फुलातील मधुरसासाठी झाडाकडे आकषिर्त होतात. पक्षांचे थवेच्या थवे फुलांनी भरलेल्या झाडांची शोभा वाढवतात. मैना, बुलबुल, पोपट, शिंजीर, कावळ, कोकीळ यांच्यासह खारुताई हजेरी लावते. मुंग्या व फुलपाखरे मधुरस प्यायला येतात. त्यांना खायला कोळी येतात. कोळ्यांना खायला पक्षी येतात. पक्ष्यांना खायला साप येतात. अशी संपूर्ण अन्नसाखळी तिथे पहायला मिळते. जंगलात भटकतांना हा निसर्गाचा वंसत सोहळा पाहायची मज्या न्यारीच…! अनेक आठवणी आणि निरीक्षणे आपल्याला नकळत येतून समृद्ध करतात. एकदा खाटीक पक्षी काटेसावराच्या फांदीवर बसलेला दिसला. मला प्रश्न पडला, की हा इथे काय करतोय…? कारण खाटीक फुलातील मकरंद पीत नाही. मी थोडा वेळ टक लाऊन पाहत बसलो. क्षणात स्वारीने झेप मारली अन चोचीत सरडा घेऊन शेजारच्या हिवराच्या झाडावर जाऊन बसली. फुलावर मुंग्या खायला कोळी आलेले असतात. त्याच फुलावरील कोळ्यांना खायला सरडा आला होता, आणि हा सारडा आपल्याला कधी सापडेल याची तो खाटीक पक्षी वाट पाहत होता. वसंत अनेक अंगांनी निसर्गात आपली भूमिका पार पडतो. आपण स्थिर व शांत राहून निरीक्षण केल्यास अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला निसर्ग देतो.

वसंताच्या आणि माझ्या बालपणीच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. गावाकडे शिमग्याचे डफडे वाजू लागताच, हजारो लालकेसरी फुलं घेऊन पळस आणि पांगारा रंगाची उधळण करीत जंगलाच सौदर्य वाढवीत होता. हे सौदर्य आम्ही शाळेच्या खिडकीतून रोज किमान महिनाभर तरी अनुभवायचो. गाव आणि शाळा डोंगराळ भागात असण्याचा असा फायदा आम्हाला अनेक अंगानी झाला याच आजही माझ्या उराशी समाधान आहे. फाल्गुनाची चाहूल लागताना ऐन भरात आलेला वसंत हळूहळू वार्धक्याकडे झुकायला लागतो. निसर्गाच्या रंगांच्या भरगच्च खजिना हळूहळू कमी होत जातो. शाल्मली, बहावाचेही खुललेले रूपसौंदर्य आता निवळायला लागते. नाना रंगांची आतषबाजी करणा-या फुलांना तर किती फुलावं असं होताना अचानक फुल गळायला सुरवात होते. मात्र निसर्गाच्या हा रंगोस्तव वन्यजीव तसेच मानवजातीला जीवन देणारा ठरतो. धकाधकीच्या जीवनशैलीत वर्षातून एकदा येणारा या निसर्गाच्या रंगोस्तवाचा आनंद आपण नक्कीच घ्यावा.

@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक
दिशा फाउंडेशन,अमरावती
Email- disha.wildlife@gmail.com

2 thoughts on “जंगलाची होळी…..!”

  1. रंगोत्सव निसर्गाचा हा लेख खूप छान लिहिलाय तुम्ही… लिखाणाची भाषा अतिशय ओघवती आहे.. भाषेच सौंदर्य, शैली ही फुलांच्या रंगासारखी सुंदर आहे… कसारा घाटात पळसाची लाल नि नारिंगी रंगाची फुले खुप पहायला मिळतात…

    1. खूप खूप धन्यवाद प्रभा साळवे madam
      आपल्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच बोलक्या आहेत. आभारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *