इथे प्रत्येक जन जनासाठी झटणारा सापडतो. मात्र मुक्या प्राण्यांच्या जीवांसाठी झटणारे दुर्मिळच…! हल्ली तरुणाई इकडे फिरकू लागली खरी पण त्यातल्या त्यात प्रामाणिक कार्य करणारे दुर्मिळच..! असे अवलिया अवतीभोवती आहेत पण अजूनही जनमानसांत त्यांची प्रतिमा पोहोचली नाही हे देखील एक चित्र आहे. चंद्रपूर जिल्हा तसाही मानव वन्यजीव संघर्ष आणि प्रदूषनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर आलाय. अश्या काही गंभीर समस्यांची उत्तरे शोधण्याची धडपड एक तरुण इमाने इतबारे करतो हेही एक नवलच..! बाकीची तरुणाई प्रेमाची स्वप्ने रंगवीत असतांनाच, ऐन उमद्या वयात हा तरून वन व वन्यजीवांच्या प्रेमात पडतो. सळसळते रक्त सुसाट वेगाने धावत सुटते. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनच नाहीतर ऐतहासिक वारसाही जपण्याची इच्छा मनात घर करू लागते. निसर्ग थांबत नाही तसा तोही न थांबता अविरतपणे कार्य करीत राहतो. हा हरफणमौला तरुण आहे चंद्रपूरचा बंडू धोतरे…!

बंडु सितारामजी धोतरे हा चंद्रपूर येथील इको-प्रो या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. बी.ए. उत्तीर्ण झाल्यांनतर व्यवसाय म्हणून विमा अभिकर्ता म्हनुन काम करतोय. सन २०१३-१४ सालचा भारत सरकारचा ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’, २००६ चा चंद्रपूर पर्यावरण संवर्धन समितीचा ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’ यासह आजवर एकूण १३ पुरस्कारांचा मानकरी ठरलाय. बंडू सध्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचा सल्लागार सदस्य असून चंद्रपूर जिल्ह्याचा मानद वन्यजिव रक्षक देखील आहेत. चंद्रपूर जिल्हा पर्यावरण समिती, जिल्हा जैवविवीधता समिती, जिल्हा शांतता समिती, वृक्ष प्राधीकरण चंद्रपूर शहर महानगरपालीका आदि समित्यावर सदस्य आहे. वन्यजिव संर्वधन, सर्प संवर्धन आणि प्रबोधन याबरोबरच पुरातत्व संर्वधन, आपातकालीन व्यवस्थापन, रक्तदान व इतर सामाजीक कार्य देखील तो करीत असतो. पर्यावरण संरक्षणाकरीता आणि चंद्रपूर जिल्हयातील सामाजीक प्रश्नाकरीता त्याने केलेली आंदोलने चर्चेचा विषय ठरली. ताडोबा तसेच लोहारा जंगल परीसरातील वन्यजिवाचा अधिवास, त्यांचे संचार मार्ग व चंद्रपुरातील पर्यावरणास धोकादायक प्रस्तावीत कोळसा खाण प्रकल्पाविरोधात ‘अदाणी गो बॅक’ आंदोलन विशेषत्वाने गाजले होते. यासाठी सन २००८ मध्ये आठ दिवस नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान अन्नत्याग सत्याग्रह देखील केला होता. तसेच सन २००९ मध्ये चंद्रपुर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रदुषण व शहरातील इतर प्रदुषणाविरोधात अन्नत्याग, सन २०१२ मध्ये वाघांच्या प्रभावी संरक्षणाच्या मागणी करीता अन्नत्याग आदीमधून त्यांच्या सहकाऱ्यांनी वन्यजीवांच्या कल्याणासाठी लढा दिला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गांवाचे पुनवर्सन कार्यात इको-प्रो संस्थेची मदत घेण्यात आली आहे. संकटग्रस्त वन्यप्राणी रेस्क्यु ऑपरेशन करतांना आजवर एकुण ९३ रेस्क्यु ऑपरेशन करीत वाघ, बिबट, अस्वल, मगर, रानगवे आणि तृणभक्षी प्राणी यांचे प्राण वाचविले आहेत. दि. १ मार्च २०१७ रोजी सुरु करण्यात आलेले ‘चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान’ आगळेवेगळे ठरले. या अभियानाची दखल ‘मन की बात’ मध्ये स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी घेतली. अजूनही अधिक दिवस झालेत तरीही हे अभियान सुरु आहे. किल्य्याची स्वच्छता मोहीम नियमित सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदानद्वारे करण्यात येते.

बंडू यांचा सर्पमित्र ते वाघमित्र हा प्रवास तरुणांनी कित्ता गिरवावा असाच आहे. सामाजीक क्षेत्रात इको-प्रो संस्थेच्या माध्यमातून नगर संरक्षक दल, वन्यजीव संरक्षक दल तर ग्रामीण भागात ग्राम रक्षक दलाची निर्मीती करून युवकांची मोठी चळवळ या माध्यमातून सुरू आहे. शेतकरी आणि वाघ संघर्ष टाळण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा, शेतपीक व वन्यप्राणी संरक्षण करीता सौर उर्जा कुंपन योजना राबविण्यासाठी प्रयत्न, पर्यावरण जनजागृती करीता शाळांमध्ये इको-प्रो स्कुल क्लबची निर्मिती, जिल्ह्यातील महत्वपूर्ण असे कन्हारगांव अभयारण्य करिता पाठपुरावा, जिल्ह्यातील वनक्षेत्रातून प्रस्तावित चारपदरी रस्ते बांधकाम दरम्यान अंडरपासेसची मागणी करिता ४२ किमी मूल ते चंद्रपुर ‘पैदल मार्च’, यामुळे शासनाचे लक्ष वेधन्यास त्यांना यश आले.

ताडोबा बफर अंतर्गत गावातील शेतजमिनिवर बांधले जाणारे रिसोर्टचे बांधकाम होऊ नये म्हणून आवश्यक गावात नो-गो झोन, स्थानिक सल्लागार समितीच्या माध्यमाने लागू करण्यात यश, जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या गावात बिबट समस्या मुक्त करण्यास प्रयत्न, इको-प्रो संस्थेच्या मध्यमातून संस्थेचे अनेक सर्पमित्र शहरात व गावात सेवा देत आहेत. गांवखेड़यात सर्पदंश वर जनजागृती, प्रथमोपचार, अंधश्रद्धा दूर करण्याचे कार्य निरंतर सुरु आहे. ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत मानव वन्यजीव संघर्ष दृष्टया अति संवेदनशील ४० गावात प्रायमरी रिस्पॉन्स टीम तयार करणे व वनविभागाला यातून सहकार्य करणे असे अनेक कार्य तो करतोय. बंडू आणि त्यांचे सहकारी यांचा मानव आणि वन्यजीवांच्या सहजीवनाचा हा मार्ग मला प्रचंड आशादायी वाटतो आहे. इतरही शहरातील वन्यजीवप्रेमींनी ही वाट धरावी असे वाटते.

@ यादव तरटे पाटील

     वन्यजीव अभ्यासक,

     दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

     disha.wildlife@gmail.com

    www.yadavtartepatil.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *