प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. पण त्यातल्या काही घटना ह्या जीवन समृद्ध करणाऱ्या असतात. काही निसर्गवेडे अश्याच घटनामधून आपली वाट निर्माण करू पाहतात. जणु त्यांना निसर्गाचा संकेतच मिळाला की काय..! या पवित्र भावनेने ते झपाटून जातात. त्यांचही बालपण चिउकाऊच्या गोष्टीतलच असतं, मात्र त्यांच्यातल हिरवं मन त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते नकळतपने निसर्गात रस घायला लागतात. यातूनच उद्याचे वन्यजीव संशोधक, अभ्यासक व पर्यावरण प्रेमी तयार झाल्यास नवल वाटण्याच काहीच कारण नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इतिहासाच्या नकाशावर आहेच. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. तर प्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव यांचे जन्मगाव आहे. याच गावात इयत्ता चौथीत शिकणारा हा वनवेडा दुपारच्या वेळी आईच्या कुशीत पडलेला असायच्या. झोपेच सोंग घेऊन बरेचदा झोपायचं नसतांनाही त्याला पडून आवडायचं. आईच्या कुशीत शांत पडून असतांना दुरून कुठूनतरी येणारा ‘कुक..कुक…कुक…’ असा आवाज तो सतत ऐकायचा. त्यावेळी हा कोणत्या पक्ष्याचा आवाज आहे याची कल्पना देखील त्याने केली नव्हती. मात्र ‘तांबट’ पक्ष्याची आवाजाच्या रुपाने झालेली त्याची ही पहिली भेट होती. सूपाला दोर बांधून चिमण्या पकडणे, जांभळाच्या झाडावर येणाऱ्या कोकीळ पक्ष्याची कुहू… कुहू… अशी नक्कल करणे, तारेवर बसलेल्या वेड्या राघुंना दगडाने टिपायचे उद्योग करणे असले प्रकार करण्यात बालपण गेलेल्या या वेड्या पक्षीमित्राच पुढे पक्षी आणि जंगल हेच विश्व होईल याची कल्पनाही त्याला नव्हती. पण नियती व निसर्गाचा खेळ मात्र निराळाच असतो, नाही का…! दिगंत आकाशात झेप घेतो तसाच हा दिगंतसखाही आता निसर्गात झेप घेतोय. त्यांच्यासकट तो निसर्गातील प्राणी, फुलपाखरे व इतर जीवांचाही मित्र बनून काम करतोय.

शिवाजी विद्यापीठातून बी.एस.सी. नंतर पर्यावरण विषयात एम.एस.सी. पूर्ण करतांना धर्मराज पाटील हा तरुण खऱ्या अर्थाने जंगलात भटकायला लागला. पर्यावरण विषयात पक्षी व जंगल सोडून बाकी सर्व माहिती आहे. मात्र जंगलाची माहिती कुठून व कशी मिळेल याचा तो शोध घेऊन लागला. त्याच निसर्गाप्रती असलेल संवेदनशील मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतच. मग काय महाविद्यालयात होणारे तास आणि प्रात्यक्षिके बुडवून तो पक्षीनिरीक्षण करायला लागला. जंगलात शिबिरात सामील होण्यासाठी लागणारे पैशे खिशात नसायचे म्हणून डब्लू.डब्लू.एफ. व ‘निसर्ग’ इत्यादी संस्थामार्फत होणाऱ्या शिबिरात स्वयंसेवक म्हनुंन सामील होऊ लागला. नाचरा, नीलकंठ, हळद्या, शिंजीर, कस्तूर, मोठा धनेश सारख्या पक्ष्यांच्या पिसांचे रंग पाहता पाहता त्याच्या आयुष्यात हळू हळू रंग भरायला सुरवात कधी झाली, हे देखील त्याला आज सांगण कठीण जातंय. पाहता पाहता पक्ष्यांची मंजुळ शिळ त्याच्या मनात कायमचं करून बसली. आपल्या आयुष्याच सिंहावलोकन करतांना धर्मराज पाटील भावूक होतो. बालपण आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणी ह्या समृद्ध करणाऱ्या आणि त्याला दिशा देणाऱ्या असल्याच सांगतो.

धर्मराज पाटील आज पूर्णवेळ निसर्ग सेवेत तल्लीन होऊन काम करतोय. इतर क्षेत्रात जबरदस्त रोजगाराची संधी असतांना स्वतच आयुष्य पणाला लाऊन ही वाट निवडणे म्हणजे हिम्मतच म्हणावी लागेल. वन्यजीव संशोधक असलेला धर्मराज पर्यावरण शिक्षणाचे कामही करतो. पक्षी त्याच्या आवडीचा विषय असून जगात सन १९९७ नव्यानेच भारतात पुनर्शोध झालेला रानपिंगळा त्याच्या खास संशोधनाचा विषय होता. पश्चिम घाटातील स्थानविशिष्ट पक्षी प्रजाती संदर्भात सध्या तो संशोधन करतोय. बिबळ्या तसेच हत्ती आणि मानव वन्यजीव संघर्ष यावरही त्याने संशोधन केलंय. भारतातील पूर्वोत्तर राज्यातील फुलपाखरे यावर सध्या तो संशोधन करतोय. राष्ट्रीय संस्थेत जैवविविधता तज्ञ म्हणून तर केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाच्या ग्रीन इंडिया मिशन मधेही धर्मराजने सल्लागार म्हणून काम केलंय. महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील एकूण ३३ गावांमध्ये जैवविविधता कायदा २००२ अंतर्गत जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे केवळ गठनचे नव्हे तर त्यांची लोकजैवविविधता नोंदवही तयार करण्यात धर्मराजने भरपूर मेहनत घेतली. धर्मराज आय.यु.सी.एन.च्या वनपिंगळा प्रजाती संवर्धन आयोगावर सदस्य असून तो ‘ईबर्ड’चा महाराष्ट्राचा संपादक देखील आहे. सध्या तो ‘जीवित नदी’ या पुण्यातील संस्थेचा संस्थापक संचालक आहे. पुण्यातील ‘सेव सलीम अली पक्षी अभयारण्य’ या मोहीमेचा समन्वयक म्हणून काम करतोय. धर्मराज यांनी आजवर अनेक वृत्तपत्रात लिखाण केले असून त्याचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक शोधनिबंध आणि शोधप्रकल्पही त्याने पूर्ण केले आहेत. आरे कॉलनी आणि सलीम अली पक्षी अभयारण्य संवर्धनासाठी सुरु केलेली उपवासाच्या मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. जंगलातला वाटाड्याना आपल्या गुरुस्थानी मानणारा धर्मराज पाटील हे एक वेगळच रसायन आहे. आजच्या डिजीटल युगात कॅमेरातून वन्यजीवन निहारण्यापेक्षा फोटो काढण्याकडेच अधिक कल असल्याच सांगताना तो खजील होतो. ज्ञानदेव तुकोबाराया ते थेट शिवाजी महाराजापर्यन्तचा संवर्धनाचा पक्का आणि प्रामाणिक धागा आजच्या मराठी रक्तात अधिक प्रमाणात नसल्याची खंत तो व्यक्त करतो. इथे बव्हंशी प्रमाणात अनास्था असून हा एक दैवदुर्विलास असल्याच धर्मराज सांगतो. म्हणूनच ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आपणच झटायला हवं, म्हणजे तो वारसाच मानवी अस्तित्व टिकवायला मदत करू शकेल इतकं साध गणित एकट्या धर्मराज पाटील याला कळलं. मात्र आता बारी आहे ती लोकं आणि स्थानिक प्रशासनाची…! म्हणजे हा वारसाच मानवी वस्ती नी त्याचं अस्तित्व टिकवायला मदत करेल.

@ यादव तरटे पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
संपर्क- ९७३०९००५००

ईमेल- disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com

4 thoughts on “दिगंतसखा : धर्मराज पाटील”

  1. मा यादव सर,
    सर्व प्रथम आपण लिहलेल्या या सुंदर लेखाबद्दल आपले खूप कौतुक!
    धर्मराज पाटील यांच्या सोबत काम करण्याची व त्यांच्याकडून निसर्ग आणि त्याच्या सौंदर्याबाबत शिकण्याची संधी आम्हालाही मिळाली. मात्र या व्यक्तीमतवाला जवळून समजून घेण्यास आपल्या लेखाने मोठी मदत केली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक द्यन्यवाद. धर्मराज पाटील आपण आपल्या निसर्गाप्रती केलेल्या कार्याबद्दल आम्हाला सदैव अभिमान राहील. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!
    किशोर गजघाटे

    1. प्रिय
      किशोरजी
      आपले अनंत आभार…
      धन्यवाद
      विंनती की या वेबसाईट वरील लेख वाचत रहा.
      कृपया आपला नंबर द्यावा.

  2. प्रिय यादव
    सर्व प्रथम आपण लिहलेल्या या सुंदर लेखाबद्दल आपले खूप कौतुक!
    खूप वाईट वाटले हे एकूण . भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *