लीकडच्या काळात पर्यटन क्षेत्रात वनाधारित पर्यटन क्षेत्राचे महत्व अधिकच वाढले आहे. सन १९६६ मध्ये भारतीय पर्यटन महामंडळ तर १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ ची स्थापना करण्यात आली. आता भारताच्या अर्थकारणात पर्यटनाचा हिस्सा वाढत आहे. व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने अन अभयारण्ये यांनी आधुनिक पर्यटन व्यवसाय म्हणुन भरारी घेतली आहे. भारत हा जगातील महत्वाच्या जैवविविधता असलेल्या देशात मोडतो. जगाच्या एकूण ८% जैवविविधता आपल्या देशात आहे. भारतात १०५ राष्ट्रीय उद्याने, ५० व्याघ्र प्रकल्प तर ७०० च्या वर अभयारण्ये आहेत. मध्यप्रदेशातील कान्हा, सातपुडा, बंदीपूर, पन्ना व पेंच, राजस्थान मधील रनथंबोर, उत्तराखंड मधील जिम कार्बेट, पश्चिम बंगाल मधील बक्सा आणि महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा, सह्यान्द्री, बोर व नवेगाव नागझिरा ई. व्याघ्र प्रकल्प पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरली आहेत. विशेष म्हणजे एकट्या महाराष्ट्रात ६ राष्ट्रीय उद्याने, ६ व्याघ्र प्रकल्प, ५० अभयारण्ये व ४ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. सहा राष्ट्रीय उद्याने व नरनाळा, वान, अंबाबरवा, उमरेड कराण्डला, देऊळगाव रेहेकुरी, भीमाशंकर, तानसा, कर्नाळा, ताम्हिणी, नान्नज, टिपेश्वर आदि अभयारण्यासकट सर्व जंगलामध्ये वनाधारित पर्यटनाचा पायंडा पडलाय. पर्यटन क्षेत्र हे फक्त थंड हवेची ठिकाणी केवळ हीच संकल्पना जनमानसात न राहता आता चित्र बदलले आहे. वनाधारित पर्यटन क्षेत्रांनी केवळ आपले पायच रोवले नसून आता ते घट्ट देखील झालेय.

वनाधारित पर्यटन व्यवसायात हळूहळू यात मोठे बदल व्हायला लागले आहेत. व्याघ्र केंद्रित पर्यटनाची दिशा निश्चित झाली खरी पण ज्या वाघाभोवती हे सर्व क्षेत्र उभ राहिलंय. त्या वाघोबाला याची पुसटशी कल्पनाही नसावी. एकीकडे आपण भारतीय राज्यघटना ते थेट युनोच्या माध्यमातून वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित रहाव म्हणून संघर्ष करीत असतो. मानवी हक्क व त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील असतांना कायदेशीर लढेही देतो. अश्यातून आपल्या पुढ्यात हव ते पाडून घेतो. मानवहित जपताना जीवन देणाऱ्या जल, जमीन, जंगल व जैवविविधतेचा मात्र आपल्याला सपशेल विसर पडतो. वन्यप्राण्यांच्या बाबतीत आपण इतके निर्दयी कसे असू शकतो..? व्याघ्रकेंद्रित पर्यटनाचा वाघाला त्रास होतोय. केवळ पर्यटनाच्या नावाखाली चाललेला हा गोरखधंदा अन त्याच अर्थकारण हे अनेक अंगानी वाघाच्याच मुळावर उठलंय हे वास्तव नाकारून चालणार नाही.

सामाजिक माध्यमांवर आपण अनेक चित्रफिती व छायाचित्र पाहतो. पाच पन्नास जिप्सी वाहने, हौशी पर्यटक अन छायाचित्रकारांचे मोठमोठाले संच अन हा सगळा लवाजमा जणू आसुसलेलाच असतो. वाघाचे छायाचीत्र घेण्यासाठी स्पर्धा लागली असते. कधी छायाचित्र घेतो अन कधी समाजमाध्यमावर टाकतो, किती लाईक अन किती कमेंट्स मिळवितो याची घाई झालेली असते. वाघ दिसताच हा संवेदनाहीन तथाकथिक पर्यटक संप्रदाय सगळे नियम मोडून वाघाचा पाठलाग करतो. वाघोबाचे दर्शन व्हावे म्हणून जिप्सी चालक व मार्गदर्शक एकमेकांना फोन करून बोलावतात. वाघाला पाहण्याची लालसा इतक्या स्थरावर जाते कि, गाडीचा अमर्याद वेग अन त्यातून उडणारा धूर पाहताना अश्या प्रवृत्तीची कीव आल्याशिवाय राहत नाही. काही दिवसा पूर्वी एक व्हायरल झालेल्या चित्रफितीत वाघोबा शिकार करत होता. जस एकाला दिसलं त्यांनी सगळ्यांना बोलाऊन घेतलं, पाहता पाहता पंचविशच्या घरात जिप्सी गाड्या एकत्र आल्या. वाघाला सुचेनास झाल. वाघाने चक्क त्यांच्या समोर शिकार केलेलं हरीण रस्त्यावरून ओढत ओढत सुरक्षित ठिकाणी एका झुडपात नेलं. हे सगळं होताना पर्यटक आणि छायाचीत्रकारांची झुंबड जमली. हा सगळा तमाशा बिनदिक्कतपणे चालला होता. दोन वर्षापूर्वी नागपूर जवळील उमरेड कर्हाडला अभयारण्यात एक जिप्सी वाघाच्या इतक्या जवळ गेली, कि वाघोबा आलेत आणि जिप्सीचा साइड ग्लास चाटू लागले, स्वारी इतक्यावरच थांबली नाही तर जीप्सिमधील एका बाईच्या हातालाही चाटले. काही दिवसापूर्वी ताडोबातील एक वाघीण आपल्या पिल्लांना शिकारीचे धडे देत असतांना एक जिप्सी त्यांचा जवळ गेली. जिप्सी पाहताच वाघीण चिडली. अनुचित प्रकार घडणार तितक्यात चालकाने वाहन मागे घेतले. जर अश्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण..?

दि. २ जून २०११ च्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परिपत्रकामध्ये संरक्षित क्षेत्रातील पर्यटनासाठी मार्गदर्शक सूचना वजा नियमावली ठरवून दिलेली आहे. जंगलाला साजेसे कपडे, वन्यप्राण्यांना त्रास होणार नाही अशी छायाचित्र घेणे, वन्यप्राण्यापासून किमान १५ मीटर अंतर ठेवणे, मोठ्याने न बोलणे, प्राणी आराम करीत असतांना व शिकार करित असतांना त्यांना त्रास होणार नाही असे कृत्य न करणे, वाहनाची वेग मर्यादा पाळणे हे सर्व बंधनकारक आहे. मात्र पर्यटक, मार्गदर्शक व जिप्सी चालक हे वन विभागासमोर बिनदिक्कतपणे या नियमांची बहुतक वेळा पायमल्ली होताना दिसते. टाळी एका हाताने वाजत नाही, नाण्याला दोन बाजू असतात. पर्यटक वाघ दिसलाच पाहिजे याचा हट्ट करतात. प्रसंगी जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना आमिषही दिले जाते. पर्यटकांना वाघ दिसला तर आपल्याला अधिक पर्यटक मिळतील व रोजगार मिळेल हा विचार तर दुसरीकडे वन विभाग व त्यांचे कायदे याची अधिक प्रभावी पद्धतीने अंमलबजावनी होत नाही. यात आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या व्याघ्रकेंद्रित पर्यटनात मोठमोठाले हॉटेल व्यावसायिक उतरले आहेत. वाघोबाच्या दर्शनावर यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. काही हॉटेल व्यावसायीकांना तर व्याघ्र संवर्धनाचा अधिकच पुळका येतो. व्याघ्र प्रकल्पलगत जमिनी घ्यायच्या, तिथे हॉटेल वजा रिसॉर्ट उभारायचे आणि स्वयंसेवी संस्था स्थापन करायची व त्याच्या आड आपला धंदा करायचा. वाघाच्या तथाकथित प्रेमापोटी चालेलला हा गोरखधंदा एखाद्या दुधखुळ्यालाही लक्षात येईल. वन पर्यटन हे ज्या स्थानिक समुदायासाठी सुरु करण्यात आलं त्यांच्या हाती मात्र तुटपुंजी रक्कम येते. आता तर नाईट सफारी अन मचाण थ्रिलिंग च्या नावाखाली महसूल गोळा करण्याच्या नविनच जावईशोध केलाय. आणखीनच कळस म्हणजे हे वाघांचे बारसे करण्याची प्रथा केवळ हास्यास्पद आहे. वाघाचे बारसे केले कि सगळ्यांना सांगायला हे मोकळे. ‘माया’ आज इकडे दिसली, ‘मटकासूर’ आज तिकडे होता. पर्यटनाची ही सर्व लालसी पिलावळ हळूहळू आता वाघाच्या वैयक्तिक जीवनावर मूलगामी व प्रतिकूल परिणाम करणारी ठरत आहे.

स्थानिक समुदायाला रोजगार, वनसंवर्धनात स्थानिकांच हातभार, वन विभाग व स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय, मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत अश्या व्यापक दृष्टीने वनपर्यटन सुरु झालेल असतांना, हे सर्व महत्वपूर्ण असतांना, नेमकी इथेच दिशाभूल झालेली दिसतेय. एकूणच वन विभाग, स्थानिक समुदाय व वनपर्यटनातून मिळणारे उत्पन्न याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उपयोग होणे अपेक्षित असतांना व्याघ्र पर्यटनाची दिशा भरकटली आहे. एकीकडे वाघाला मिळालेले अधिक महत्व व त्याभोवती असणारे अर्थकारण तर दुसरीकडे उपेक्षित असलेले वन्यजीवन अश्या वेगळ्याच वळनावर हे पर्यटन येऊन स्थिरावले आहे. वाघा व्यतिरिक्त असलेले इतर वन्यजीव मात्र यामध्ये उपेक्षितच आहे. व्याघ्रकेंद्रित पर्यटन अन व्याघ्र केंद्रित संवर्धन अश्या दोनीही बाजूने इतर वन्यजीवन उपेक्षित आहे. वाघ जंगलाचा राजा आहे, अन्नसाखळीमध्ये शिखर प्रजाती म्हणून महत्वपूर्ण आहे, मात्र जंगलामधील ‘वाघ ते वाळवी’ अशी संपूर्ण अन्नसाखळी सुद्धा महत्वाची आहे. सस्तन प्राणी, पक्षी, साप व इतर सरीसृप, कीटक व फुलपाखरे, कोळी, नाकतोडे व इतर सूक्ष्मजीव असा जंगलातील अन्नसाखळीचा डोलारा उभा राहतो. त्या त्या परीसंस्थेच्या अन्नसाखळी व अन्नजाळ्यातील प्रत्येक सजीव महत्वाचा असतो. मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसते आहे. तरस, रानकुत्री, लांडगा, कोल्हा यासारखे मांसाहारी प्राणी, चौसिंगा, काळवीट सारखे शाकाहारी प्राणी मात्र या संवर्धनाच्या चळवळीत मागे पडलेले दिसत आहेत. कारण पर्यटन व संवर्धन चळवळीचे मूळ अर्थकारणात दडले आहे.

वन विभाग व स्थानिक मार्गदर्शकांची भूमिका यात महत्वाची आहे. पर्यटकांना फिरवतांना घ्यावयाची काळजी, शिस्त, वाघ व इतर जंगलातील जैवविविधतेला पर्यटन करताना त्रास होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे. जंगलात येणाऱ्या पर्यटकाला वाघ पहायचा असतो. व्याघ्र दर्शन झाले नाही तर तो हिरमुसला होतो. प्राणी, पक्षी, फुलपाखरे व वृक्षसंपदा यांचही एक सुंदर विश्व दडलेलं आहे. व्याघ्र दर्शन न झाल्यास इतर जैवविविधते बद्दल मार्गदर्शकांनी पर्यटकांना माहिती दिली तर येणारा पर्यटक नक्की आनंदी व समाधानाने घरी परतेल. केवळ जंगलातील वाघ व इतर प्राणीवीश्वच महत्वाच नाहीत तर पर्यटन व वन्यजीवांचा विचार करता पक्षी, सरीसृप, फुलपाखरे, कोळी व इतर वन्यजीवांच विश्व अतिशय महत्वपूर्ण ठरते. वन विभागाच्या अश्या प्रयत्नांना वन मार्गदर्शक व पर्यटकांनी सहकार्य करून भविष्यातील आपले स्वकल्याण सर्वांनी साधने अभीप्रेत आहे.

वाघ कि मांजरी…!

पर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत असावा का..? खर तर वाघ माणसाला टाळतात. मेळघाटमध्ये अनेक वर्षापासून माझा हाच अनुभव आहे. मेळघाटात वाघ दिसत नाही अशी पर्यटकांची कायम ओरड असते. म्हणजे तिथे वाघ नाही असा अर्थ काढणे चुकीचे होईल. मेळघाट हा इतर जंगलाच्या तुलनेत कमी पर्यटन असलेला भाग आहे. उंच सखल व दऱ्या-खोऱ्याचा भाग असल्यामुळे भरपूर लपण सुद्धा आहे. मोठा भौगोलिक प्रदेश आहेच, तुलनेने वाघांची संख्या कमी जरी असले तरी मेळघाट मधील वाघ माणसाला टाळतात. माणसाला टाळणे हा वाघाचा स्वाभाविक गुण आहे. खर तर हाच वाघाचा अस्सल वाघपणा आहे. मात्र अति पर्यटन होत असलेल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघ आता मानसाळू लागले आहे. वाहनाजवळ सहज येतात. याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. अतिपर्यटनामुळे वाघाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतोय यावर आपल्या देशात अजून तरी फारसा विचार झालेला नाही. आफ्रिकेमध्ये मॅट हायवर्ड व जिना हायवर्ड यांनी पर्यटनामुळे सिंहाच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर काय परिणाम होतो. सन २००८ मध्ये त्यांनी यावर संशोधन केलंय. मानवाच्या अस्तित्वामुळे सिंह प्रचंड तणावात असल्याचे त्यांच्या संशोधनात आढळून आले. जांभई देणे, बसने, उठणे, फिरणे तसेच लोळणे, चाटणे व पिल्लांना प्रशिक्षण देणे इत्यादी बाबीवर कमलीचा प्रतिकूल परिणाम झाल्याचे त्यांना आढळले. पर्यटक नसतांना शारीरिक व मानसिक स्थिरपणा होता याउलट पर्यटक असतांना या ते अस्वस्थ झाल्याचे त्यांनी आपल्या संशोधनात स्पष्ट केले. इतकच काय तर सिंहाच्या ह्रदयाचे स्पंदन वाढून ते अस्वस्थ होत असल्याचे व त्यांची शारीरिक उर्जा कमी होत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. प्रजाती जरी भिन्न असल्या तरी सिंह आणि वाघ एकाच कुळातले प्राणी आहेत. म्हणूनच वाघावरही हा परिणाम होत असावा असे आपण निश्चित म्हणून शकतो. काही देशामध्ये प्राण्यांच्या मिलन काळात व विणीच्या काळात एखादे क्षेत्र पर्यटनासाठी बंद केले जाते. भारतात असे फारसे होताना दिसत नाही. आपल्याकडे बिनदिक्कतपणे वाघाच्या मिलनाची छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकली जातात. हे वास्तव फार दुर्दैवी आहे.

भारतात केवळ २२२६ वाघ

आज जगातील वाघाच्या एकूण ९ प्रजातीपैकी दक्षिण चायनिस वाघ, कास्पियन वाघ, जावा वाघ व बाली वाघ अश्या चार प्रजाती नामशेष झाल्या आहेत. ६०० ते ८०० मलयन वाघ, ४०० ते ५०० सुमात्रन वाघ, ४५० च्या घरात सायबेरीयन वाघ, ७५० ते १३०० इंडोचीन वाघ व केवळ २२२६ रॉयल बेंगाल वाघ शिल्लक राहिले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला जगात अंदाजे एक लाख तर भारतात चाळीस हजार  वाघ होते. आता मात्र ३००० ते ४५०० इतकेच राहिले आहेत.

@ यादव तरटे पाटील

वन्यजीव अभ्यासक,

दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क – ९७३०९००५००

6 thoughts on “वाघ दाखविण्याचा गोरखधंदा…!”

 1. अतिशय सुंदर लेख आणि मांडणी. अभ्यासपूर्ण लेख मनाला भावला. तुमच्या लेखणीला आणखी बळ येवो ही सदिच्छा.

  1. प्रिय
   श्री.अमित अरुणराव पाटील साहेब
   धन्यवाद, आपण वेळातला वेळ काढून प्रतिक्रिया दिल्यात. आणि शुभेच्छा दिल्यात त्यासाठी आभारी आहे. पुढील लेख नक्की वाचावेत या आग्रहासह..! धन्यवाद

  1. Yes Dear Sureshji Thank you very much for your valuable feedback. I will do it, stay tuned. thank you.

 2. खुप खुप अभिनंदन सर ??
  तुमचे सारे लेख वाचले , अतिशय सुंदर आणी माहितिने परिपुरण
  असे तुमचे लेखन आहे़़आशा करतो असेच लेख वाचायला
  मिळतिल ??

  1. नक्कीच राजू
   तुमचे आनंद आभार,
   खर म्हणजे तुमच्या सारख्या वन मार्गदर्शकांना फिल्ड वर फक्त काही दिवसच मार्गदर्शन करता येते. आणि वन मार्गदर्शकांचे ट्रेनिंग नियमित होत नाहीत अथवा तिथे वेळेच्या मर्यादा येतात. म्हणून मध्ये खंड पडू नये आणि तुमची उजळणी या माध्यमातून व्हावी हा देखील या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात तुम्हाला आणखी लेख नक्की वाचायला मिळतील. जे लेख तुमच्या आयुष्याच्य आणि वन्यजीवांच्या दृष्टीने महत्वाचे असतील. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *