सातपुडा पर्वत म्हणजे प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत होय. येथील जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे व कोळी आणि इतर कीटक मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. सर्वात प्राचीन भाग एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. सातपुडा पर्वत म्हणजे ज्या ठिकाणी सात पर्वतरांगा एकत्र येतात किंवा ज्याच्या सात घड्या आहेत असा पर्वत भाग होय. सातपुडा पर्वत रांगा मध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शी भागात आदिमानवांनी सुमारे १५ हजार वर्षापूर्वी तेथील गुहांमध्ये जिराफ व इतर प्राण्यांची चित्रांचे रेखाटन आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत आपल्याला पाहायला मिळतात. एवढच नव्हे तर ‘ऐने-अकबरी मध्ये सुद्धा सातपुड्याच्या समृद्धतेचा उल्लेख आढळतो. अगदी अलीकडच्या काळात “जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहेन के फुल खिला है” या रुडयार्ड किप्लिंग आणि रेडीयार्ड किप्लिंग यांच्या ‘जंगल बुक’ मधील गाण्याच्या खुमारीचा ठसा आजही मनाच्या ओलाव्यावर कायमचा उमटलेला आहे. किप्लिंग बंधूंनी आपल्या ‘जंगल बुक’ मध्ये याच परिसराच वर्णन केलेल आहे. यावरूनच मध्यप्रदेशात ‘मोगली पेंच अभयारण्य’ देखील आपल्याला पाहायला मिळते.

सातपुडा पर्वताची एकूण लांबी ९०० किमी तर सरासरी उंची १२२० मीटर (४००० फुट) इतकी असून द्विपकल्पीय भारतातील हा अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. सातपुडा पर्वताच्या मुख्यतः तोरणमाळ टेकड्या,महादेव टेकड्या, गाविलगड टेकड्या आणि मैकल टेकड्या अश्या उपरांगा आहेत.या रांगामध्ये मुख्यतः तीन जंगलाचे प्रकार आपल्याला दिसून येतात.पचमढी परिसरातील जंगल निमसदाहरित असून इतर भागात म्हणजे तोरनमाळ टेकड्या आणि गाविलगड टेकड्या यात शुष्क पानगळी प्रकारचे वन असून मैकल च्या टेकड्या मध्ये मान्सून परतीच्या काळात पाऊस येत असल्या कारणाने येथील जंगलात आर्द्रता असल्यामुळे हा जंगलाचा प्रकार आर्द्र पानगळी प्रकारचे जंगल म्हणून ओळखल्या जातो.गुजरात, मध्यप्रदेश, छातीसगड आणि महाराष्ट्र या चार राज्यात मुख्यतः सातपुडा पर्वत पसरलेला आहे. भारतातील सर्वात प्राचीन नदी तापी (प्राचीन नाव ‘ताप्ती’) आणि नर्मदा याच पर्वताच्या कुशीतून उगम पाऊन वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात. दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडणारा दुवा म्हणजे सातपुडा पर्वत होय.गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान इत्यादी राष्ट्रीय उद्याने आणि कान्हा,सातपुडा,बांधवगड,पेंच(मध्यप्रदेश) व पेंच(महाराष्ट्र),मेळघाट इत्यादी व्याघ्र प्रकल्पात जंगलाचा राजा वाघ आणि समृद्ध जैवविविधता आजही टिकून आहे. सातपुड्याच्या कुशीत आजही सुमारे ५०० वाघांचा आश्रय असून अनेक धोके असुनही आपला राष्ट्रीय प्राणी वाघ सगळे चटके सहन करत आपला जीवन जगत आहे. सुरपानेश्वर अभयारण्य (गुजरात), मेळघाट परिसरातील नरनाळा,अंबाबरवा,मेळघाट व जळगाव जिल्हातील यावल अभयारण्य (महाराष्ट्र) तसेच मध्यप्रदेश मधील बोरी अभयारण्य आणि महत्वाच म्हणजे पचमढी बायोस्फीयर रिझर्व यामध्ये संपन्न जैविविधता आढळून येते.

सातपुडा पर्वत संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्षित असून आजवर झालेल्या संशोधनानुसार या पर्वत रांगेत साग, साल, मोह, ऐन, धावडा, कुसुम, बेल, करू, अर्जुन, लेंडी, तिवस, बांबू व अनेक गवताच्या प्रजाती सह १३०० च्या वर वनस्पतीच्या प्रजाती आहेत. वाघ, बिबट, रानकुत्रा, कोल्हा, तडस या सारखे मांसाहारी तर भारतातील सगळ्यात मोठे हरीण सांबर आणि चितळ, भेडकी, चौसिंगा, रानगवा,  ससा, नीलगाय इत्यादी तृनभक्षी तर माकड, वानर, उडती खार सारखे वृक्षचर प्राणी आणि अस्वल आणि रानडुक्कर सारखे मिश्राहारी प्राणी आहेत. एकूणच २७ प्रकारचे सस्तनी प्राणी येथे आढळतात.

पक्ष्यांच्या बाबतीत सातपुडा समृद्ध असून सातपुड्यातील जंगलात ४९५ प्रकारचे पक्षी आढळतात. भारतातील पक्ष्यांच्या १,२५६ या संखेच्या तुलनेत यांचे प्रमाण ४०% इतके म्हणजेच एकट्या सातपुड्यात भारतातील एकूण संखेच्या ४०% प्रजाती आढळून येतात. २००३ मध्ये सातपुडा पर्वत रांगेत ११७ वर्षानंतर पुन्हा शोध लागलेला ‘रानपिंगळा’ पक्षी हा येथील खास आकर्षण होय. २००३ पक्षीतज्ञांनी सातपुड्यातील जंगलात रानपिंगळ्याच्या पुनर्शोध घेऊन सातपुडा पर्वताच्या जैविविधतेची ख्याती सातासमुद्रापार नेऊन ठेवली. रान पिंगळ्याची खासियत म्हणजे हा दिनचर आहे. बहुदा पिंगळा सारखे पक्षी निशाचर आहेत. यासोबतच मलबारी धनेश, तुर्रेवाला सर्पगरुड, शिंगी डूमा, मत्स्य गरुड, सिरकीर मलकोहा, रातवा, घोन्घी खंड्या, नवरंग, चंडोल, रेखीकंठी देवकान्हाई, धोबी, तीरचीमनी,  खाटिक, दयाळ, निलकंठी, सातभाई, वटवट्या, चश्मेवाला, मोरकंठी लीटकुरी, नाचन, स्वर्गीय नर्तक, रामगंगा, कांचन, टकाचोर ई. पक्षी आढळून येतात.

तद्वतच हरीणसरडा, फॉरेस्ट कलोटेस,लेपर्ड गेको अश्या २२ सरडे आणि पालीच्या प्रजाती आहेत. ३ मगरीच्या प्रजाती असून १२ प्रकारची कासवे सातपुडा पर्वतरांग आणि परिसरात आढळून येतात. सातपुड्यातील सापांचीही विविधता संपन्न असून नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापड्या, पोवळा सारख्या विषारी सापाबरोबरच धामन, तस्कर, उडणारा साप, नानेटी, डुरक्या घोणस, पानदिवड असे अनेक बिनविषारी तर मांजऱ्या, हरणटोळ हे निमविषारी असे एकूण ४५ साप येथे आढळतात.

परागीभवनात महत्वाची भूमिका बजावणारे १८२ प्रकारची फुलपाखरे इथल्या जंगलात आढळून येतात. शनी पाकोळी, स्वैरिणी, गौरांग, राजा, मयूर भिरभिरी, शेंदूर टोक्या, सरदार, नवाब, मयूर भिरभिरी, उर्वशी, चिमी, नकाशा, चिता, बिबळ्या, चांदवा, भटक्या, परदेशी अशी अनेक फुलपाखरे फुलातील मकरंद टिपताना किंवा उन्हात पंख उघडून उर्जा घेत असतांना आपल्याला पाहायला मिळतात.सातपुड्याचा जंगलातील या फुलपाखरांना पाहण्याची मजा काही न्यारीच आहे.सातपुड्याच्या अन्नासाखळीत या फुलपाखरांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे.

अलीकडच्या काळात दुर्लक्षित विषय असलेल्या कोळ्यांना देखील सुगीचे दिवस आले आहेत.मध्य भारतात सन २००७ नंतर कोळ्यांच्या बाबतीत खूप मोठ संशोधनाचे काम सुरु झालाय.सन २००८ मध्ये सातपुडा जंगलात प्रथमच मी ‘ टॅरँटुला कोळी’ या प्रजातीची सर्प्रथम नोंद केली आहे. सातपुडा पर्वत रांगा कोळ्यांच्या संखेच्या बाबतीत अतिशय जास्त समृद्ध असून येथे ४०० चे वर कोळ्यांच्या प्रजाती आढळतात. येथील कोळ्यांची वैविध्यता फार वेगळी आणि महत्वाची आहे.या सर्व समृद्ध जैविविधतेवरून आपल्याला सातपुड्याच्या समृद्धतेची प्रचीती येते. निसर्ग संतुलन अन नियमनात महत्वाची भूमिका असलेल्या या जैविकविविधतेला पर्यायाने  सातपुडा पर्वताला अनेक धोके देखील आहे हे वास्तव नाकारून चालत नाही. सातपुड्याचा खरा मानबिंदू म्हणजे येथील वाघ आणि त्यांची संख्या होय. सातपुड्यातील निबिड जंगलात वाढती शिकार, अधिवासात होणारी गुरेचराई, वनवनवा, वृक्षतोड, मानवाचा अति हस्तक्षेप ई, कारणामुळे वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एके काळी सातपुडा पर्वत रांग आणि परिसरात वाघांची प्रचंड संख्या होती. आज मात्र समृद्ध वारसा असलेला हा प्रदेश वाघ ते वाळवी यांच्या नात्यात अडसर निर्माण होत आहे.पर्यायाने जंगलातील अन्नसाखळी विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. मी गेल्या काही दिवसात महाराष्ट्र वन विभागाच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ‘शिकार प्रतिबंधक दल’ आणि सी.बी.आय. समवेत वाघाच्या शिकार प्रतिबंध कारवाईत काम केलय.मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ‘शिकार प्रतिबंधक दल’ आणि सी.बी.आय. यांच्या संयुक्त कारवाईत वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यात आले.खोप मोठ शिकाऱ्यांच जाळ असलेल्या शिकाऱ्यांच्या ह्या टोळ्यांनी आजवर अनेक वाघांची शिकार केली. तूर्तास यांना लगाम लावण्यात यश जरी आल असल तरी वाघाच भविष्य फार उज्वल आहे अस नक्कीच म्हणता येणार नाही.

सातपुड्यातील जैवविविधतेला नुसता शिकार हाच धोका नाही तर या प्रदेशातून मुसळी व इतर अनेक दुर्मिळ वनौषधीची तस्करी केली जाते. अस्वल,सांबर, चितळ, ससा अश्या अनेक प्राण्यांची तर आपला राष्ट्रीय पक्षी मोर व तितर, लावा, पळसमैना, हरीयल अश्या अनेक पक्ष्यांचीही तद्वतच सापांचीही बिनदिक्कतपने शिकार केली जाते. आदिवासी व इतर समुदाय यांच्या वाढत्या लोकसंखेचा ताण सातपुड्याला व तेथील जैवविविधतेला आता असह्य होतो आहे.पण मुक्या जंगलाच आणि प्राणी, पक्षी याचं ऐकणार कोण? माणूस आपल्या अति हव्यासापोटी शेखचिल्ली सारखा वागायला लागलाय. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी आमच्या सारख्या वन्यजीव संरक्षांचे प्रयत्न फारच तोटके पडताहेत. सातपुडा पर्वतातील वनांना दरवर्षी वनवनवा लावल्या जातो. स्थानिक लोकांनी अज्ञान आणि चिडखोर प्रवृत्तीने जंगलाला आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविविधतेचा ऱ्हास होतो. पण हे सगळा आमच्या आदिवासी बांधवाच्या बुद्धीच्या पलीकडलं जाते. निसर्गाधीष्ठीत वन्यजीव व पर्यावरणाला अनुसरून असलेली आदिवासींची जीवनशैली आता उपभोग ग्रस्त संस्कृतीकडे वाटचाल करीत आहे. मेळघाट व सातपुड्यातील इतर परिसरात वाघांच्या शिकारीत असलेला त्यांचा सहभाग मनात खूप काही प्रश्नचीन्ह निर्माण करणारा आहे. त्यांच्याच समूहातील काही लोकांमुळे अख्खा समुदाय आज बदनाम होतोय. आदिवासी समुदायाची रक्षकाची भक्षक होण्याच्या मार्गाने चाललेली वाटचाल मनाला फार चटका देणारी आहे. आज सातपुड्यातील जी जंगले टिकून आहेत ती केवळ ज्यांना कायद्याने संरक्षनाचा दर्जा प्राप्त झाला ते व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राखीव जंगले यांच्या मुळेच आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणी जंगलाला व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राखीव जंगले अश्या स्वरूपाचा दर्जा मिळाला नाही त्या परिसरातील सगळे जंगल खाण्यात स्थानिक समुदाय कुठेच मागे दिसत नाही. हेही वास्तव फार बोलके आहे. अश्याच पद्धतीने जैविविवाधेतचा ऱ्हास होत राहिला तर येथील पक्ष्यांचा किलबिलाट अन वाघाची डरकाळी कायमची हवेत विरेल की काय अशी शंका मनात आल्या शिवाय राहत नाही. म्हणूनच स्थानिक आदिवासी बंधूंना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे. वनविभागा मार्फत सातपुडा पर्वताच्या गाविलगड रांगामधील मेळघाट परीसरातील तब्बल १३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसन झालेल्या गावांनी वाघाला मोकळा श्वास घेण्यास त्याची हक्काची जागा त्याला परत मिळवून दिली करिता त्यांचे आणि वन विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. तर मेळघाट भागातिलच ग्राम बोरीखेडा सारखी गावे आज चांगली कामे करताहेत. गरज आहे ती आणखी हजारो अशी गावे तयार होण्याची तरच सातपुड्याच्या ह्या समृद्ध जैवविविधतेचा वारसा पुढच्या पिढीला पाहायला मिळेल. या जंगलात आपला राष्ट्रीय प्राणी ‘वाघ’ आणि इतर प्राणी, पक्षी, फुलपाखरे अशी समृद्ध संतुलित जैवविविधता सुखाने नांदेल.

@ यादव तरटे पाटील 

दिशा फाउंडेशन, अमरावती

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *