मेळघाट व्याघ्र प्रकल्प

गळीकडे नुसती हिरवळच हिरवळ अन त्याच हिरव्या चादरीवर दाट धुके पसरलेले दिसतात. जणू स्वर्गाच भासतो मेळघाट. म्हणूनच निसर्गप्रेमींची पाऊले आपोपाप मेळघाटकडे वळायला लागतात. सातपुडा पर्वताच्या कुशीत गाविलगडच्या टेकड्यामध्ये ‘कुला मामाच’ मेळघाट आहे. जेथे घाटांचा मेळ होतो ते मेळघाट, इतकीच मेळघाटची ओळख नसून ‘कुला’ अन ‘कोरकू’ ही देखील मेळघाटची एक जगावेगळी ओळख आहे. मेळघाट परिसर व मध्यप्रदेश मधील काही जिल्ह्यातच ‘कोरकू’ आदिवासींच वास्तव्य आहे. कोरकू भाषेत वाघाला ‘कुला’ म्हणतात. काही स्थानिक ठिकाणांची नाव देखील यातूनच आलेत. जसे की कुला म्हणजे वाघ आणि  ‘कासा’ म्हणजे जमीन होय. वाघाची जमीन ‘कुलाकासा’ आणि पुढे याचाच अपभ्रंश होऊन ‘कोलकास’ हे नाव पडले. मेळघाट परिसरातील एकूण ३०९ गावामंध्ये कमीअधिक प्रमाणात कोरकू समुदाय आढळतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पअंतर्गत गाभा क्षेत्र व लगतच्या ११८ गावे सुद्धा कोरकू बहुल आहेत. मेळघाट परिसरातील अनेक गावांची नावे व नैसर्गिक पाणवठे हे कुला नावाला प्राधान्य देऊन निर्माण झाली आहेत. कुलाचावडी, कुलाकुंडी, कुलाखोरा व कुलादेव अश्या अनेक अंगाने कुला हा कोरकुंच्या संस्कृतीतला अविभाज्य अंग आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ‘अंबाबरवा’ गावातील या आजोबाकडून मेळघाटचे अस्सल किस्से ऐकायला मिळाले. आता अंबाबरवा गावाच पुनर्वसन झालं आहे.

मेळघाट परिसरातील अमरावती जिल्ह्यातील किल्ले गाविलगड व जिल्पी आमनेर, अकोला जिल्ह्यातील नरनाळा व बुलढाणा जिल्ह्यातील पिपरडोल आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत मोठा तोऱ्याने उभे आहेत. किल्ले गाविलगडचा इतिहास सर्वपरिचित आहे. इंग्रजी सत्तेपुर्वी गाविलगडाचा शेवटचे सरदार म्हणून इतिहासात ‘बेनिसिंग’ यांच नाव अजरामर आहे. सरदार बेनिसिंग यांच्या शौर्यगाथेची साक्ष आजही गाविलगड किल्ल्याचा दिल्ली दरवाजा देतो आहे. सरदार बेनिसिंगाच्या बंदोबस्तासाठी इंग्रजांना चक्क ‘लॉर्ड वेलस्ली’ ला पाचारण कराव लागलं होत. लॉर्ड वेलस्ली हे नंतर ‘ड्युक ऑफ वेलिंग्टन’ म्हणून जगप्रसिद्ध झाले. किल्ले गाविलगड व सरदार बेनिसिंग यांच्या निधड्या छातीची कल्पना आपण करू शकतो. पण बेनिसिंग यांचा इतिहास आजही फारसा कुणाला माहिती नाही.  सन १८५७ च्या स्वातंत्रसमरात मेळघाट परीसरातील किल्ले इग्रजांनी उध्वस्त करण्याचे आदेश दिल्याचे संदर्भ ‘गाईड टू चीखल्दा’ मध्ये पहावयास मिळतात. वने, वन्यजीव, इतिहास, स्थानिक आदिवासी कोरकू आणि पर्यटन अश्या अनेक अंगाने मेळघाट जगावेगळ आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात मुक्त विहार करणारा रानगवा

मेळघाटातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी व सरीसृप यांची विविधता ही डोळ्यांच पारणे फेडणारी आहे. मेळघाट परिसरात पक्षी व फुलपाखरांचे निरिक्षण करण्यासाठी दुरूनदुरून निसर्गप्रेमी येतात. तापी, सिपना, गाडगा, डोलार, खांडू व खापरा या स्थानिक नद्या मेळघाटच्या जैवविविधतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. सन १९७३ मध्ये जाहीर झालेल्या व्याघ्र प्रकल्प योजने अंतर्गत पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पात मेळघाटचा समावेश केला गेला. २२ फेब्रूवारी १९७४ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. मेळघाट मध्ये १ राष्ट्रीय उद्यान व ४ वन्यजीव अभयारण्य असून १ प्रादेशिक विभाग आहेत. गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट अभयारण्य, वान अभयारण्य, अंबाबरवा अभयारण्य व नरनाळा अभयारण्य अश्या एकूण १५००.४९ चौरस वर्ग किमी. क्षेत्राचा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समावेश होतो. तसेच बफर क्षेत्र ५२९ चौरस वर्ग किमी. क्षेत्र मिळून एकूण २०१९ चौरस वर्ग किमी. क्षेत्रासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रशासन काम करते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गुगमाल, सिपना, अकोट वन्यजीव विभाग आणि बफर साठी नव्याने मेळघाट वन्यजीव विभागासह आता चार  विभाग आहेत. अमरावती प्रादेशिक वनविभाग अंतर्गत असलेल्या ३ विभागांपैकी मेळघाट विभाग हे मेळघाट परिसरात आहेत.

सन १९९७ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तब्बल ११७ वर्षांनंतर आढळलेला पक्षी ‘रानपिंगळा’ 

मेळघाटचे जंगल हे शुष्क पानगळी प्रकारचे जंगल आहे. मेळघाट परिसरात साग, साल, मोह, अर्जुन, आंबा, ऐन, धावडा, कुसुम, बेल, करू, लेंडी, तिवस, बांबूसह गवताच्या प्रजाती व महत्वाच्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत. जंगलातील अन्नसाखळीत या वृक्ष प्रजातींचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. या वनस्पतीच्या प्रजाती मेळघाटातील भूस्थित परिसंस्थांचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्याचे कार्य करतात. मेळघाटातील वाघ व इतर समृद्ध जैवविविधतेला जीवन देण्याच काम हे जंगल करतंय. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, रानकुत्रा, तडस, कोल्हा, रानमांजर, भेडकी, चौसिंगा, उडती खार, रानडुक्कर अश्या एकूण २७ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. कोहा, कुंड, बोरी, वैराट, चुर्नी, अमोना, नागरतास, बरुखेडा, गुल्लरघाट, धारगड, केलपाणी, सोमठाणा, चूनखडी, अंबाबरवा आणि आता डोलार गावाचे पुनर्वसन झाल्याने येथील वन्यप्राण्यांना सुगीचे दिवस आलेत. लोकांनी गजबजलेल्या मातीवर वन्यप्राण्यांचा होणारा मुक्त संचार मनाला प्रचंड आनंद देणारा आहे. नरनाळा, सेमाडोह व हरिसाल परिसरातील पर्यटन क्षेत्रामध्ये अस्वल, रानगाव, चितळ, सांभर सहज पर्यटकांचे लक्ष वेधतात. जैवविविधतेच्या दृष्टीने मेळघाट समृद्ध आहे. रानपिंगळा व मलबारी धनेश इथल्या खास पक्षी प्रजाती असून येथे २९५ प्रजातीचे पक्षी, ३३ सापांच्या प्रजातीसह सरडे व पालीच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. फुलझाडे व इतर वनस्पतीजीवन समृद्ध असल्या कारणाने इथे फुलपाखरांची वैविध्यता मोठ्या प्रमाणात दिसून येते. मेळघाटच्या जंगलात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळून येतात. भारतातील फुलपाखरांच्या १५०२ च्या संखेत ही संख्या तब्बल ९% इतकी आहे. चिखलदरा व घटांग परिसरात फुलणारी ‘कारवी’ (Carvia callosa) वनस्पतीच्या फुलांवर मधमाशा, फुलपाखरांची रेलचेल पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. मेळघाट कोळ्यांच्या बाबतीत सुद्धा संपन्न आहे. संपूर्ण मेळघाट परिसर विस्तीर्ण आहे. विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण ‘चिखलदरा’ हे सुद्धा मेळघाट परिसरातच आहे.  येथील पावसाळा पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतो.  एकदा का या परिसराला तुम्ही भेट दिली, तर  तुम्ही कायम प्रेमात पडाल. यात तिळमात्रही शंका नाही.

@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क – ९७३०९००५००
disha.wildlife@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *