निसर्गाचा मितवा : संजय करकरे

निसर्गाला काळजातून जपणारे, पर्यावरण शिक्षण व वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे मोचकेच…! आणि असे वन अवलिया इतक्यावरच थांबत नाहीत तर ते त्यांच्या सहज सोप्या लिखाण शैलीतून रानमेव्याची मेजवानीही देतात. इतकंच काय तर निसर्गाप्रती समाजमनात नवचेतना निर्माण करण्यातही यशस्वी होतात. हा चमत्कार एक सच्च्या मनाचा माणूसच करू शकतो. पत्रकारिता क्षेत्रात संपादक म्हणून जबाबदारी पार पडतांना व सगळं काही सुरळीत सुरु असतांना अचानक एक धाडसी निर्णय घेणे. जबाबदार मराठी वृत्तपत्राच्या संपादक पदाला कायमचा रामराम ठोकणे. केवळ प्रेमापोटी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश करणे म्हणजे स्वतःचीच परीक्षा घेणे होय. दोन मुली व पत्नीसह तुटपंज्या पगारावर गुजराण करणे आणि हे कारण कठीण जाईल याची कल्पना असतांना सुद्धा केवळ जंगलाच्या प्रेमापोटी निर्णय घेऊन मोकळे होणाऱ्या या दाम्पत्याने आपल्यासमोर एक आदर्शच प्रस्थापित केलाय. आपली आत्ताची झोळी रिकामी असतांनाही भविष्याच्या झोळीत आपली स्वप्ने बघणारे हे दम्पत्य निघाले एका खडतर वाटेच्या प्रवासाला…! प्रसिद्धीचे मोठे वलय बाजूला ठेऊन स्थिर पगाराची नोकरी असतांनाही यांच्या मनात ही निसर्ग शिक्षणाची पालवी त्यांना का बरे स्वस्थ बसू देत नसावी. तर  आपल्या उपजिवीकेपेक्षा आपल्या जीविकेला महत्व देणारी हीच माणसं असतात. खर म्हणजे निसर्गाचीच ही योजना म्हणावी लागेल. कारण आज त्याच पालवीचा डेरेदार वटवृक्ष होताना आपण पाहतोय.

वाणिज्य शाखेत आपली पदवी उत्तीर्ण करून काही काळ पत्रकारिता करणारा तरुण आपल्या आयुष्याला अत्यंत सुंदर रीतीने कलाटणी देतो. पर्यावरण शिक्षणाधिकारी ते थेट त्याच संस्थेच्या सहायक संचालक पदावर विराजमान होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. संजय करकरे हे यातलच एक नाव आहे.   संजय करकरे सध्या ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ‘सहायक संचालक’ आहेत. सकाळ वृत्तपत्राचे संपादकपदी असतांना त्यांनी अनेक सकारात्मक बातम्या व लिखाण केलंय. वृतपत्रे ही जनमानसापर्यंत पोहोचतात. तो समाजमनाचा आरसा असतो. इतकंच काय तर समाजमन जागृतीच काम वृतपत्रातून अविरत होतच राहते. वृतपत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा वन्यजीव व पर्यावरण संवर्धनकरिता उत्तम उपयोग करतांना त्यांना मी पाहिल आणि अनुभवलं आहे. अनेक वर्ष संपादक म्हणून काम केल्यांनतर अचानक या अवलियाने वृत्तपत्र व पत्रकारिता क्षेत्राचा कायमचा निरोप घेतला. सन २००५ मध्ये ते बि.एन.एच.एस. मध्ये ‘पर्यावरण शिक्षण अधिकारी’ म्हणून रुजू झालेत. चांगल्या पगाराची नोकरी व एक लोकप्रिय क्षेत्र सोडून दोन मुली व आपल्या पत्नी सौ.संपदासह निवडलेली ही वाट सहज नव्हतीच. मात्र मोठ्या वृत्तपत्राचे संपादक ते आता एका मोठ्या संस्थेचे ‘सहायक संचालक’ पर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. आयुष्यात धाडस करून आपल्याला हव त्या क्षेत्रात पाय घट्ट कसे करता येतात याच एक उत्तम उदारहण त्यांनी मांडलंय. आजच्या युवा पिढींनी आदर्श घ्यावा असच काहीस रसायन यांच्या व्यक्तीमत्वात दडलंय. सकाळी ६ पासून ते रात्री कितीही वेळ होवो त्यांची उर्जा कमालीची असते. शांत व संयमी स्वभाव, आपल्या कामाप्रती असलेली कमालीची निष्ठा, वन्यजीव संशोधन व संवर्धन तसेच पर्यावरण शिक्षणाची मनापासून आवड, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची शैली व आदिवासी युवकांबद्दलची असलेली संवेदना त्यांच्यातील हे गुण मला व्यक्ती म्हणून अतिशय महत्वाचे वाटतात. हा माणूस किमयागारच म्हनावा लागेल. त्यांची प्रत्येक भेट मनाला नवी उमेद देणारी असते. वेगवेगळ्या विषयावर चर्चा अन हितगुज कायमच खुणावत असते. त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या परीसस्पर्शाने अनेक युवक आज निसर्गमित्र बनले आहेत.

मध्य भारतातील जंगलांचे संरक्षण व संवर्धन तसेच जंगलालगतच्या गावातील लोकांचे पर्यावरण संवर्धनातून आर्थिक समावेशन करण्याच्या दृष्टीने ते गेल्या १४ वर्षापासून अविरतपने करीत आहेत. निसर्ग संपन्नतेचे महत्व, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन ई. वर त्यांनी जंगलालगतच्या १०० हून अधिक शाळामध्ये ही कृतीशीलता निर्माण केली. तरुणाचे संघटन, महिला सक्षमीकरण, स्थानिकांना रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि संसाधन विकास व शाश्वत जीवनशैलींचा प्रसार व प्रचार करण्यात ते आजही व्यस्त आहेत. जंगलालगतची गावे चूलमुक्त करण्यावर त्यांचा भर आहे. यासाठी त्यांनी बी.एन.एच.एस.च्या माध्यमातून गावागावांत १००० हून अधिक गोबरगॅस केवळ कार्यान्वितच केले नाहीत तर ते आजही यशस्वीरित्या सुरु आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील युवकांना प्रशिक्षण देऊन बांबू कलाकृती केंद्राची पळसगाव येथे स्थापना केली. बांबूतून शाश्वत रोजगाराची संधी उभी करण्यात यांचा तेथे मोलाचा वाटा आहे. पत्रकारीतेची उर्जा निसर्ग शिक्षनाकडे वळती करणारे हे दुर्मिळच उदाहरण म्हणता येईल. निसर्ग शिक्षण, संवर्धन व संरक्षण अशी तिहेरी चळवळ निर्माण करण्याची लालसा मनाशी बाळगून कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्वाला केवळ आपल्या अर्धांगिनीचाच मितवा म्हणणे योग्य होणार नाही तर ‘निसर्गाचा मितवा’ ही उपाधी योग्य आहे असे वाटते.

@ यादव तरटे पाटील

     वन्यजीव अभ्यासक,

     दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *