स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या पत्रासोबत शेजारच्या काकूंनी एक चिठ्ठी माझ्या हातावर ठेवली. मी पहिल्यांदा ती चिठ्ठी उघडून पहिली. ‘राजुरा तलावावर ५०० क्रेन्स पक्षी आलेले आहेत – राजू’  ह्याच चार ओळी त्या चिठ्ठीत लिहिलेल्या होत्या. वाचून मनाला सुखद धक्का बसला. कारण ५०० करकोचे एकावेळी पहायला मिळणार होते. या विचारात बुडालो असतांनाच तत्क्षणी या व्यक्तीने मनात कायमच घर केलं. घरी भेट न झाल्यामुळे चिठ्ठी लिहून ठेवणारे आणि आवडीने नवख्या तरुणांना निसर्गाशी जोडणारे डॉ. राजू कसंबे म्हणजे निसर्ग गुरुच होय. काही व्यक्ती असतातच अश्या की, त्यांचा सहवास आणि बोलणं म्हणजे कायम उर्जा देणारं..! ते सतत सक्रीय आणि सकारात्मक विचारांनी भारलेले असतात. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शालेय जीवन व्यतीत केलेल्या राजू ते डॉ.राजू कसंबे यांचा जीवनपट म्हणजे एक प्रेरणादायी प्रवासाचा ग्रंथच म्हणावा लागेल.

ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारा हा तरून गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतो. आपल्या चटणी भाकरीचा किस्सा सांगताना ते आजही भाऊक होतात. ‘अपणा भी एक किस्सा है दोस्त’ अस म्हणताना ते हसतात पण त्या हसण्यात प्रचंड संघर्ष दडलाय. पाच बहिणी आणि चार भाऊ असा गोतावळा अन घरची जेमतेम परिस्थिती असतांना कशीबशी पदवी संपादन केल्यानंतर नोकरी शिवाय पर्यायही नव्हता. स्वतःच ‘स्व’पन मारून एका खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारून पुढे विविध विषयात ९ पदव्या संपादन करण्याच काळीज ठेवणारा हा माणूस पाहता पाहता निसर्ग संशोधनच शिवधनुष्य पेलायला लागला. नोव्हार्टीस सारख्या जगप्रसिद्ध औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून साडे सतरा वर्षे काम केल्याचा प्रवास उलगडताना राजू कसंबे एक वेगळ्या रुपाने आपल्या समोर येतात. एक एक पक्षी अगदी निरखून पाहण्यात ते वस्ताद आहेत. आपल्या निसर्ग प्रवासात अनेकांना सहप्रवासी करण्याची त्यांची सवय शिकण्यासारखी आहे. सन १९९७ ते २००४ पर्यंत अमरावती येथे त्यांनी युथ होस्टेल्स असोसिएशन सोबत काम केलं. पुढे अमरावतीला त्यांनी वन्यजीव व पर्यावरण संस्थेची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील नळ दमयंती सागराच्या मुखावर वर्धा नदीच्या थडीला वीण करणाऱ्या निळ्या शेपटीच्या वेडाराघु या पक्ष्यांवर त्यांनी संशोधन करून एम.एस.सी. पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. सन २००४ ते २०१० दरम्यान नागपुर येथे प्रसिद्ध पक्षीसंशोधक डॉ. अनिल पिंपळापुरे व गोपाळराव ठोसर यांच्या ते संपर्कात आले. त्याच दरम्यान त्यांनी सेवादल महिला महाविद्यालयातून आचार्य पदवीही मिळविली. खर म्हणजे एका पक्ष्यावर कुणी आचार्य करू शकते का…? हो करू शकते, कारण राजू कसंबे यांनीच ते करून दाखवलंय. एका पक्ष्यावर आचार्य पदवी संपादन करून संशोधन करण्याचा विदर्भात एक नवा पायंडा पाडण्यात कसंबे यांनी आपला कसब दाखविलाय. नागपूर येथील महाराज बाग परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतांना त्यांना एक दिवस शिंगासारखी चोच असलेला पक्षी दिसला. शिंगचोच्या पक्ष्याचे दर्शन डॉ. कसंबे यांच्या आयुष्याला कलाटणी देईल असे कदाचित त्यांच्या ध्यानीमनी देखील आले नसावे. एका पक्ष्यावर पीएचडी करून गगनभरारी कशी घेता येऊ शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. राजू कसंबे होत.एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे खाजगी कंपनीत नोकरी करतांना शिंगचोच्या किंवा भारतीय राखी धनेश पक्ष्यावर संशोधन करतांना त्यांची दमछाक तर होत होतीच मात्र त्यातला आनंद त्यांना अधिक सुखावणारा होता.

पक्ष्यांच्या निसर्गवाटेचा हा वाटसरू हळूहळू पक्ष्यांमध्येच अधिक रमायला लागला. ‘केवळ आणि केवळ पक्ष्यांचीच दुनियादारी’ असच त्यांच विश्व झालेलं. म्हणतात ना निसर्गही अश्यांना आपल्या कुशीत घेतो. त्याला अशी माणस हवीच असतात. निसर्गाची योजना न्यारीच असते. नोव्हेंबर २००९ मध्ये डॉ.कसंबे यांनी ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट पाहीला. मग त्यांच्यातला खरा पक्षीप्रेमी बाहेर आला. म्हणूनच दि.३१ डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी नोकरीचा चक्क राजीनामाच देऊन टाकला. बक्कळ पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन तब्बल चार महीने घरी बसून बेरोजगारीत काढणे देखील त्यांनी त्यावेळी पसंत केले. मात्र पुढे एप्रिल २०१० मध्ये ते मुंबई स्थित बीएनएचएस या संस्थेत ‘प्रकल्प व्यवस्थापक’ म्हणून रुजू झालेत. आयबीए प्रोग्रामसह ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी संवर्धन शिक्षण केंद्राचे प्रभारी म्हणून काम सुरू केले. एप्रिल २०१८ मध्ये सहाय्यक संचालक (शिक्षण) यासह बीएनएचएस मुंबईच्या संवर्धन शिक्षण केंद्राचा कार्यभारही ते सांभाळत आहेत. ‘पक्षी व पर्यावरण शिक्षण’ हे त्यांचे मुख्य काम असून हौशी निसर्गप्रेमींसाठी ते अभ्यासक्रम सुद्धा चालवितात. आजवर त्यांचे विकिपेडियाला ७८०० छायाचित्रे अपलोड झालेली आहेत. त्यांचे तीन ई-बूक मोफत स्वरुपात इंटरनेट उपलब्ध असून त्यांचे १,८२,००० डाउनलोड झाले आहेत. निसर्गविषयक लेखन तसेच कविता लेखनासह पक्षी फुलपाखरे सुद्धा महत्वाचे असल्याचे ते सांगतात. त्यांनी पक्षी व फुलपाखरे या विषयावर आजवर एकूण १३ पुस्तकं व १०० हून अधिक शास्त्रीय प्रकाशनं, तसेच पक्षी व फूलपाखरांविषयी अनेक मराठी लेख व कविता लिहिल्या आहेत. ‘भारतातील संकटग्रस्त पक्षी’ हे सन २००९ मध्ये प्रकाशित झालेलं त्याचं पहिल पुस्तक होय. धनेशाचे गुपित, इंडिअन ग्रे हॉर्नबिल, थ्रेटन्ड् बर्ड्स ऑफ महाराष्ट्र, ईम्पॉर्टंट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्रा, पॉप्युलर बर्ड्स ऑफ मिझोरम, ईम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरियाज ऑफ इंडीया आणि ‘बटरफ्लाईज ऑफ वेस्टर्न घाट्स’ ही त्यांची पुस्तके आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये दिलेलं योगदान आणि पक्षी या विषयाला अनुसरून केलेल्या परेदशवाऱ्या मोलाच्या आहेत. विदर्भातील एका शेतकरी कुटुंबातून थेट मायानगरी पर्यंतचा प्रवास, पक्षी या विषयाला आपलं सर्वस्व मानून जगण्यातलं सातत्य, बोलका स्वभाव आणि वैयक्तिक व पक्षी जीवनातील योगदान माझ्या दृष्टीने अधिक महत्वपूर्ण आहे. धनेशाच्या धन्याचे म्हणजेच डॉ.राजू कसंबे यांच्यामुळे महाराष्ट्र पक्षी चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली हे वास्तव आहे.

© यादव तरटे पाटील
सदस्य- महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
संपर्क- ९७३०९००५००
www.yadavtartepatil.com

7 thoughts on “धनेशाचा धनी : डॉ. राजू कसंबे      ”

  1. डॉ राजू कसंबे सरांच्या जीवांप्रवासाबद्दल सुंदर व प्रेरक शब्दांकन. अगदी सुरवातीला डॉ राजू सर कारंजाला येऊन गेले आहेत. येथील प्रसिद्ध ऋषी तलावाला सुद्धा त्यांनी भेट दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *