सातपुडा पर्वत हा प्राचीन इतिहास अन समृद्ध निसर्गाची परंपरा सांगणारा भारतातील एक महत्वाचा पर्वत आहे. प्राचीन पर्वत एवढीच सातपुड्याची ख्याती नसून येथील समृद्ध जैवविवीधता हा देखील इथला खास दागिना आहे. या पर्वत रांगा मध्ये अनेक राष्ट्रीय उद्यान व अभयारण्ये वसली आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पअंतर्गत असलेले नरनाळा अभयारण्य हे सुद्धा यातलेच होय. येथे नरनाळा किल्ला आहे, मात्र नरनाळा किल्ला इतकीच ओळख न राहता आता हे अभयारण्य म्हणून नव्याने नावारुपास आलंय. गेल्या काही वर्षात झालेल्या संतुलित पर्यटनाच्या परिणामाचा परिपाक म्हणजेच नरनाळा अभयारण्य हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

नरनाळा किल्ला व अभयारण्य परिसरात मुक्त संचार करणारी वाघीण व तिचे बछडे…..!

नरनाळा अभयारण्यात केवळ इतिहासच गुंतला नाही तर निसर्गही येथे चराचरात वसला आहे. वन्यजीवन अन इतिहास अशी सुंदर रेशीमगाठ इथे बांधल्या गेली आहे. वाळवीपासून ते वाघापर्यंतचा सुंदर प्रवास आपण येथे याची देही याची डोळा अनुभवू शकतो. मध्ययुगीन इतिहासाची समृद्ध साक्ष देणारा नरनाळा किल्ला आजही मोठ्या दिमाखाने येथे उभा आहे. राजपूत घराण्यातील ‘नरनाळ सिंग’ राजाच्या नावावरून या किल्याचे ‘नरनाळा किल्ला’ असे नाव पडले. गोंड राज्यांनी बांधलेल्या हा किल्ला १५ व्या शतकात मुघलांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याचे जाफराबाद व तेलीयागड असे दोन भाग आहेत. शहानुर दरवाजा (वाघ दरवाजा), महाकाली दरवाजा (नक्षी दरवाजा) असे दरवाजे असून यातीलच एक दिल्ली दरवाजावर बहामनी साम्राज्याचा प्रभाव आढळून येतो. राणी महाल, पेशवा महाल, बारादरी, गजशाळा, तेलातुपाचे टाके, खुनी बुरुज व नगारखाना अश्या अनेक वास्तू पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. एकूण ३९२ एकर परिसरात पसरलेला या किल्याचा घेर २४ किमी इतका आहे. किल्ल्याला एकूण २२ दरवाजे व ३६ बुरुज आहे. नरनाळा किल्ला अशी ओळख असलेला हा परिसर दि.५ फेब्रुवारी १९९७ ला अभयारण्य म्हणून जाहीर झाला. नरनाळा अभयारण्य केवळ १२.३५ चौ.की.मी. परिसरात पसरलेले आहे. खर तर अभयारण्य हा नरनाळा किल्यापूरताच भाग म्हणता येईल. मात्र असे जरी असले तरी मेळघाट व्याघ्र प्रकल्प शेजारी असलेल्या नरनाळा जंगलातील वनस्पती, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी व कीटकसृष्टी मनाला भुरळ पाडल्या शिवाय राहत नाहीत. किल्ल्यात फिरताना अनेक पक्ष्यांचे दर्शन होते. शिंजीर, कृष्ण थिरथिरा, निलय, स्वर्गीय नर्तक, सातभाई, दयाळ, चिरक यांच्यासह लालबुड्या बुलुबुलचा कलरव ऐकू येणार नाही तर नवलच….! या कलरवात मध्येच आपली खारुताई येऊन तिचेही अस्तित्व असल्याची साद घालते. किल्यातील सपाट भागात फुलपाखरे व किटकांची रेलेचेल पाहून मन आनंदी झाल्या शिवाय राहत नाही. स्वैरिणी, चिमी, वाघ्या, बिबळ्या, मयूर भिरभिरी, राखी भिरभिरी, निळी भिरभिरी, लीम्बाळी, भटका तांडेल, प्रवाशी अशी एक ना अनेक फुलपाखरे येथील सौंदर्यात भर घालतात. गवतावर निवांत पहुडलेले कीटक अन पंख उघडून बसलेली फुलपाखरे आपल्या दिसतात. वाऱ्याची झुळूक येताच मोठ्या डौलाने त्यांचे झोके घेणे पाहून आपल्या मनात इर्षा उत्पन्न होते. निसर्गाच्या प्रत्येक बदलात अन स्वरुपात ते किती रममाण होतात याची प्रचीती आपल्याला आल्या शिवाय राहत नाही.

नरनाळा किल्यात आढळणार बिबळ्या (Common Leopard) नावाच फुलपाखरू

नरनाळा किल्याच्या पायथ्याशी शहानुर हे आदिवासी बहुल गाव वसलेल आहे. नरनाळा किल्याला शहानुर किल्ला सुद्धा म्हणतात. अकोला जिल्हातील अकोट तालुक्यातील नरनाळा किल्याची आजवर एवढीच काय ती ओळख. नजरेत बसेल इतके लहान क्षेत्र असलेल्या या अभयारण्यात फारसे पर्यटक फिरकत नव्हते. मात्र याला न जुमानता गेल्या काही वर्षात या अभयारण्याने कात टाकली. निसर्गाची मुक्तहस्ताने कलेली लयलूट अन इतिहासाचाही समृद्ध वारसा लाभेलेल्या नरनाळा अभयारण्यात आता पर्यटकांची रेलचेल सुरु असते. नरनाळा किल्ला व अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या इतक्यात वाढायला लागली. येथे इको हट, रेस्ट हाउस, व्ही.आय.पी. रेस्ट हाउस, डॉर्मेटरी यासह राहण्याची व जेवणाची सुविधा आहे. येथील खासियत म्हणजे ‘कोरकू तडका रेस्टॉरंट’ होय. शहानुर ते बोरी ४० किमी आणि शहानुर ते वान ७० किमी अशी उत्तम सफारी करता येऊ शकते. अभयारण्यालगतच्या पायथ्याशी असलेल्या धारगड, बोरी, गुल्लरघाट ई. या परिसरातील गावांचे पुनर्वसन झाल्यामुळे येथे उत्तम गवती कुरण (Meadow) विकसित झाल आहे.

समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी नरनाळा किल्यातील अजस्त्र तोफ

तत्कालीन उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा यांच्या कालखंडात रोवलेल्या झाडाची फळे शहानुरचे गावकरी आज चाखत आहेत. हजारोच्या घरात असलेले उत्पन्न आज वनपर्यटनामुळे लाखोचा घरात जाऊन पोहोचले आहे. मेळघाटात व्याघ्र दर्शनाची वानवा असतांनाच नरनाळा अभयारण्यात पर्यटकांना वाघाचे अनेकवेळा दर्शन होत आहे. सांबर, रानगवा, भेडकी अन नशीब जोरावर असेल तर बिबट, अस्वल देखील दर्शन देते. शहानुर ते नरनाळा किल्ला ही ७ किमी.ची पायवाट ट्रेकिंग साठी उत्तम पर्याय ठरू शकते. अनेक निसर्गवेडे पर्यटक, वन्यजीव संशोधक व अभ्यासक आणि ट्रेकर्स यांच्या मनात नरनाळा किल्ला आणि अभयारण्याचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. तुलनेने लहान क्षेत्र असलेले हे अभयारण्य अल्पावधीतच जनमाणसांच्या पसंतीस उतरले आहे. एकीकडे अख्खा मेळघाट तर एकीकडे नरनाळा अशी ख्याती या नरनाळा अभयारण्याची झाली आहे. या अभयारण्याची सफर करायला एक दिवस पुरेसा आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात वसलेल्या या नरनाळा अभयारण्याला एकदा तरी भेट द्यावीच. वन, वन्यजीव आणि ऐतिहासिक आठवणीचा नरनाळा येथील खजिना आयुष्यात चैतन्य आणणारा व तुम्हाला कायम खुणावत राहणारा आहे, हे मात्र नक्की….!

अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी- ऑक्टोबर ते जून असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या www.magicalmelghat.com या वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग करून येणे सोयीचे होईल.

कसे जावे-
विमान – मुंबईपासून ६१० कि.मी. अंतर असून जवळचे विमानतळ नागपूर आहे. नागपूर वरून अमरावती अकोट मार्गे शहानुर हे गाव प्रवेशद्वार आहे.
रेल्वे – अकोला हे जवळचे रेल्वे स्थानक असून अकोट मार्गे शहानुर ५५ कि.मी. अंतरावर आहे.
रस्ते – अकोला व अमरावती तसेच नागपूर वरून अमरावती मार्गे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नियमित बस सेवा उपलब्ध आहे.

@ यादव तरटे पाटील

दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क- 9730900500

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

View Comments

  • सर, सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे. यामध्ये अमरावती किंवा अकोला येथून पोहोचायचे कसे याबाबत उल्लेख केल्यास मदत होईल.

    • सर खूप खूप धन्यवाद नक्कीच करता येईल. मी लगेच करतो.

    • अतिशय सुंदर आणि संतुलित असा हा लेख आहे, विदर्भातील अशा लहान मोठ्या अभयारण्यावर लिखाण होणे फार गरजेचे आहे. जंगल आणि वाघ म्हटलं की ताडोबा आणि पेंच हे समीकरण जरा दुरुस्त झाले पाहिजे, नरनाळा हा अतिशय मोठं पोटेन्शिअल असलेला किल्ला आणि परिसर आपण या लेखातून उत्तम पणे मांडला आहे. या भागातील पर्यटन सर्किटसवर काम होणे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यटक वेगवेगळ्या निसर्गाच्या छटा पाहू शकतील. या लेखासाठी आपलं हार्दिक अभिनंदन.
      डॉ योगेश दुधपचारे चंद्रपूर

      • प्रिय प्रा.डॉ.दुधपचारे सर
        अतिशय समर्पक प्रतिक्रिया दिलीत आपण, लिखाण होणे गरजेचे आहे. भविष्यात तोच प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद सर आपला आभारी आहे.

  • सर, सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे. यामध्ये अमरावती येथून पोहोचायचे कसे याबाबत उल्लेख केल्यास मदत होईल.
    मला खूप आवड आहे या विषयाची

    • सर खूप खूप धन्यवाद आपल्या सूचनेची दखल घेतलेली आहे. आपली अमूल्य प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे.

  • खूप सखोल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

    • सर धन्यवाद आणि आभारी आहे.
      आपण लेख कुठे वाचला कृपया माहिती द्यावी. आणि आपला संपर्क क्रमांक द्यावा.

  • खुप चांगली माहिती यादवराव मी पावसात खूप मजा येते तिथे

    • सर धन्यवाद
      हो पावसाळा एक सुंदर अनुभव आहे.

  • छान व उपयुक्त माहिती .. सुंदर व सुलभ शब्दांकन.??? धन्यवाद ?

    • आदरणीय मामाश्री,
      खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे.

  • खुप छान माहिती आहे सर,,,, या वरन आम्हा वनमार्ग दर्शकना पण पर्यटकांना माहिती दयाला मदत मिळेल,

    • धन्यवाद रवी
      आपला उद्देश तोच आहे. निदान या काळात घरबसल्या पर्यटकांना इतकं आपण नक्कीच देऊ शकतो. बाकी पर्यटन लवकर सुरु होवो आणि तुम्हाला दिलासा मिळो ही प्रार्थना आहे.

  • फारच छान उपयुक्त माहिती,तसेच सुंदर व सुलभ शब्दांकन. ?? धन्यवाद ?

  • छान माहितीपूर्ण लेख यादव .नरनाळ्याच्या पर्यटनासाठी नक्कीच उपयोगी पडेल....

    • सर खूप खूप आभारी आहे. या निमित्ताने एक कायमस्वरूपी माहिती मिळावी यासाठी हा लेख आणि वेबसाईट प्रपंच केलाय. धन्यवाद सर

  • Sunder,avismarniy anubhav ☺️me tr vachtanna Narnalyat pohchale. ?☘️???????????????????️?️??️?️????

  • सातपुडा पर्वत रांगांमधील नरनाळा किल्ला परिसराची नि अभयारण्यातील प्राणी,पशु पक्षी यांची खूप चांगली माहिती दिली.. लेख वाचताना नरनाळा किल्ला परिसर न बघता ही
    तिथल्या निसर्गरम्य परिसर‌ डोळयासमोर उभा केला आहे तुम्ही.... पावसाळ्यात हा परिसर खुप रमणीय असेल....
    .

    • हो खुपच रमणीय असतो. पतिक्रिया बद्दल अनंत आभार आहे. खूप खूप धन्यवाद...!

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago